पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 18व्या हंगामात सलग चार सामने जिंकून चांगली सुरुवात केली. मात्र रविवारी (13 एप्रिल) त्यांची विजयी मालिका संपुष्टात आली. मुंबई इंडियन्सकडून दिल्लीला पहिला पराभव पत्करावा लागला. या पराभवाचे दु:ख पाचवतानाच संघाला दुसरा मोठा झटका बसला. बीसीसीआयने कर्णधार अक्षर पटेलवर मोठी कारवाई करत आणि त्याला 12 लाखांचा दंड ठोठावला आहे.
मुंबई इंडियन्सच्या फलंदाजीदरम्यान दिल्ली कॅपिटल्सला निर्धारित वेळेत 20 षटके पूर्ण करता आली नाहीत. त्यामुळे स्लो ओव्हर रेटसाठी त्यांचा कर्णधार अक्षर पटेलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दिल्ली संघाची ही यंदाच्या हंगामातील पहिलीच चूक आहे. IPLच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘आयपीएल आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 अंतर्गत दिल्ली कॅपिटल्सचा संघ स्लो ओव्हर रेटमध्ये दोषी आढळला आहे. त्यांचा ही आयपीएल 2025मधील पहिलीच चूक आहे. त्यामुळे संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला 12 लाखा रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अक्षर पटेल पहिल्या पराभवानंतर खूप निराश झाला. प्रेझेंटेशनदरम्यान तो म्हणाला, ‘सामना आमच्या हातात होता. मधल्या फळीतील काही फलंदाजांनी खराब शॉट खेळून विकेट गमावल्या. संघ प्रत्येक वेळी खालच्या फळीतील फलंदाजांवर अवलंबून राहू शकत नाही. खूप विचार करण्याची गरज नाही, फक्त हा एक वाईट दिवस होता इतकच म्हणू शकतो. कुलदीपने अतिशय शानदार गोलंदाजी केली. फलंदाजीच्या दृष्टीने हा सामना विसरणेच योग्य ठरेल.’