पुढारी ऑनलाईन डेस्क : IPL 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी संपली असून आता क्रिकेट चाहत्यांना आयपीएलच्या नव्या हंगामाची उत्सुकता लागली आहे. अनेक संघांनी त्यांच्या नेतृत्वातबदल केले आहेत. पण दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराची घोषणा अद्याप झालेली नाही. या संघाचे नेतृत्व कोण करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डीसीच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत अष्टपैलू अक्षर पटेल आणि वरिष्ठ यष्टीरक्षक-फलंदाज केएल राहुल यांचे नाव आघाडीवर आहे. फ्रँचायझी अधिकारी येत्या काही दिवसांत त्यांच्या नवीन कर्णधाराचे नाव जाहीर करतील असे मानले जाते. मात्र, या शर्यतीत गुजरातच्या खेळाडूकडे थोडीशी आघाडी असल्याची चर्चा आहे.
दिल्ली कॅपिटल्स त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी विशाखापट्टणमला जाण्यापूर्वी दिल्लीमध्ये एक सराव शिबिर घेणार आहे. अक्षर, राहुल, कुलदीप यादव, दक्षिण आफ्रिकेचा ट्रिस्टन स्टब्स, ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्क आणि मिशेल स्टार्क 17 आणि 18 मार्च रोजी विशाखापट्टणममध्ये जमतील.
केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी गर्भवती आहे. त्यामुळे राहुल एक किंवा दोन सामने खेळू शकणार नाही, अशी चर्चा आहे. पण हे मुलाच्या अपेक्षित जन्मतारखेवर अवलंबून असेल.
दिल्ली कॅपिटल्ससोबत सातव्या हंगामात खेळणारा 31 वर्षीय खेळाडू अक्षर राहुलपेक्षा संघाचे नेतृत्व करण्यासाठी अधिक संभाव्य उमेदवार दिसतो. राहुल पहिल्यांदाच दिल्ली संघात सामील होणार आहे.
अक्षरने 150 आयपीएल सामने खेळले आहेत आणि सुमारे 131 च्या स्ट्राईक रेटने 1653 धावा केल्या आहेत. तर 7.28 च्या इकॉनॉमी रेटने 123 विकेट्स घेतल्या आहेत.
तथापि, राहुल गेल्या काही वर्षांपासून आयपीएलमध्ये नेतृत्व करत आहे. तो यापूर्वी पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार राहिला आहे. राहुल 18 एप्रिल रोजी 33 वर्षांचा होत आहे. त्याने आयपीएलमध्ये 132 सामने खेळले असून 134 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने 4683 धावा केल्या आहेत. यात चार शतकांचा समावेश आहे.