कोलकाता ; वृत्तसंस्था : कोरोनाचे संकट मागे सारून यशस्वीपणे आयोजन करण्यात आलेली इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2022 ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आयपीएल 2022 (IPL 2022) मधील पहिली क्वालिफायर गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात मंगळवारी (24 मे) होणार आहे. त्यानंतर याच मैदानावर 25 मे रोजी लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात एलिमिनेटरची लढत होईल.
क्वालिफायर 1 मध्ये 24 मे रोजी गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात लढत होणार आहे. ही लढत कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर होईल. या लढतीत विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहोचेल तर पराभव होणार्या संघाला अंतिम फेरीत जाण्याची आणखी एक संधी मिळेल.
आतापर्यंतच्या स्पर्धेचा विचार करता गुजरात टायटन्सने जबरदस्त यश मिळवले आहे. वास्तविक नवखा संघ असल्याने त्यांच्याकडून ही अपेक्षा कोणीही ठेवली नसेेल. पण त्यांनी दिमाखात सर्वात आधी पात्रता फेरी गाठली आणि गुणतक्त्यात ते टॉपवरही राहिले. संघातील खेळाडू प्रतिभावान असले तरी एक संघ म्हणून त्यांच्यात सुसूत्रता आणण्याचे मोठे आव्हान होते. मुंबई इंडियन्सच्या छत्र छायेत तयार झालेल्या हार्दिक पंड्याने हे शिवधनुष्य चांगले पेलले. प्रत्येक सामन्यागणिक त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि ते आज क्वालिफायर-1 चा सामना खेळत आहेत. (IPL 2022)
लीगमधील धमाका पात्रता फेरीतही कायम ठेवायचा असेल तर गुजरातला राजस्थान रॉयल्ससारख्या बलाढ्य संघाला हरवावे लागेल, पण हे काम वाटते तितके सोपे नाही, कारण आयपीएलचा पहिला विजेता असलेला राजस्थान रॉयल्सचा संघ या हंगामात नव्या रूपात समोर आला असून त्यांच्याकडे अनेक मॅचविनर खेळाडू आहेत. सलामीवीर जोस बटलरने यंदा एकाच हंगामात दोन शतके ठोकली आहेत. त्याच्या एकूण 629 धावा झाल्या असून डोक्यावर ऑरेंज कॅप तो मिरवतो आहे.
तो जर मैदानावर टिकला तर गुजरातला भारी पडू शकते. त्याच्या जोडीला यशस्वी जैस्वालही राजस्थानसाठी धावा करीत आहे. याशिवाय कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पडिक्कल कोणत्याही क्षणात पारडे फिरवू शकतात. शिमरोन हेटमायरच्या रूपाने त्यांच्याकडे चांगला फिनिशर देखील आहे. शिवाय रविचंद्रन अश्विन हा बॅट आणि बॉल दोन्हीने आपली कमाल दाखवत आहे. गोलंदाजीत पर्पल कॅपधारी युजवेंद्र चहल, वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट हे यशस्वी ठरले आहेत.
गुजरातची फलंदाजीची मदार शुभमन गिल, हार्दिक पंड्या यांच्यावर प्रामुख्याने आहे. यापैकी एक जण अपयशी ठरला तर संघ दबावात येतो. गोलंदाजीत लॉकी फर्ग्युसन आणि राशिद खान यांच्याकडे प्रतिस्पर्ध्याला अडचणीत आणण्याची क्षमता आहे. विशेषत: राशिद खान गेल्या काही सामन्यांत फिनिशर म्हणून चांगलाच चमकला आहे. कोलकाताच्या स्लो पिचवर त्याची जादू चांगली चालेल.