स्पोर्ट्स

IPL 2022 : ‘प्ले ऑफ’वर पावसाचे सावट

Arun Patil

मुंबई ; वृत्तसंस्था : आयपीएलच्या (IPL 2022) प्ले ऑफ फेरीला आज मंगळवारपासून सुरुवात होणार आहे. प्ले ऑफमधील क्वालिफायर 1 ची लढत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. ही लढत कोलकात्याच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. प्ले ऑफच्या लढतीबाबत उत्सुकता वाढली असताना पश्‍चिम बंगालमध्ये आलेल्या वादळाने मोठा धक्‍का दिलाय. या वादळामुळे स्टेडियमचे मोठे नुकसान झाले आहे. यात स्टेडियममधील प्रेस बॉक्सचा देखील समावेश आहे. तर मैदानावरील काही होर्डिंगदेखील तुटले आहेत. बीसीसीआयचे प्रमुख सौरव गांगुली यांनी मैदानाला भेट दिली आहे. जर वातावरण असेच राहिले तर प्ले ऑफच्या लढती होणे अवघड आहे.

जर पाऊस कायम राहिला तर क्वालिफायर-1 आणि एलिमिनेटर हे प्ले ऑफचे सामने कसे खेळवले जाणार, हा सर्वात मोठा प्रश्‍न आहे. पण, पावसामुळे हे दोन्ही सामने होऊ शकले नाही तर फायनलमध्ये नेमके कोणते संघ जाणार, हे नव्या नियमांनुसार ठरवण्यात येऊ शकते.

खेळ होऊ शकला नाही तर असा होईल निर्णय (IPL 2022)

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये क्‍वालिफायर-1 हा सामना 24 मे या दिवशी खेळवला जाणार आहे, तर 25 मे या दिवशी आरसीबी आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवस नसतील. कारण बीसीसीआयने फक्‍त अंतिम फेरीसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

त्यामुळे पावसामुळे या दोन्ही सामन्यांमध्ये 20-20 षटके टाकणे शक्य नसेल तर दोन्ही संघांना 5-5 षटकांचे सामने खेळण्याची संधी दिली जाईल. या 5-5 षटकांच्या सामन्यांमध्ये स्ट्रॅटेजिक टाईम नसेल. या 5-5 षटकांच्या सामन्यांमध्ये विजेता ठरवण्यात येईल, पण पावसामुळे हे 5-5 षटके टाकणेही शक्य नसेल तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. या एका षटकामध्ये जो संघ बाजी मारेल, तो विजयी ठरणार आहे.

पण जर सुपर ओव्हर खेळणेही शक्य नसेल तर काय करायचे, याचा तोडगाही नियमांमध्ये काढण्यात आलेला आहे. जर सुपर ओव्हरही होऊ शकली नाही तर गुणतालिकेचा आधार घेण्यात येईल.

पहिला सामना हा गुजरात आणि राजस्थानमध्ये होणार आहे. या सामन्यात एकही षटक होऊ शकले नाही तर गुजरात गुणतालिकेत अव्वल स्थानावर असल्यामुळे त्यांना विजेता ठरवले जाईल आणि गुजरातचा संघ फायनलमध्ये दाखल होईल.

एलिमिनेटर हा सामना आरसीबी आणि लखनौ यांच्यामध्ये होणार आहे. या सामन्यातही एका षटकाचा खेळ झाला नाही तर गुणतालिका पाहिली जाईल आणि त्यानुसार लखनौच्या संघाला विजयी ठरवले जाईल. त्यामुळे पावसाचा मोठा फटका आरसीबीच्या संघाला बसू शकतो, हे समोर आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT