स्पोर्ट्स

RRvsMI : पांड्या शेर तर स्टोक्स सव्वाशेर, मुंबईवर दणदणीत विजय

Pudhari News

अबु धाबी : पुढारी ऑनलाईन 

हार्दिक पांड्याने २१ चेंडूत ६० धावा करत मुंबईला १९५ धावांपर्यंत पोहचवले. पण, राजस्थानच्या स्टोक्सने दमदार शतक ( १०७ ) ठोकत हे आव्हान १८.२ षटकातच पार केले. या रनचेसमध्ये संजू सॅमसनने ३१ चेंडूत नाबाद ५४ धावांची खेळी करुन स्टोक्सला मोलाची साथ दिली. मुंबईकडून पॅटिन्सनने दोन विकेट घेतल्या. या विजयाबरोबरच राजस्थान रॉयल्सने गुणतालिकेत सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे तर चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा तळात गेली आहे. 

मुंबईच्या १९५ धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात अडखळती झाली. १३ धावांवर पहिला सलामीवीर उथप्पा बाद झाला. त्यानंतर कर्णधारही संघाच्या ४४ धावा झाल्यानंतर बाद झाला. या दोघांनाही जेम्स पॅटिन्सनने बाद केले. पण, यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने राजस्थानचा डाव सावरत धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी ११ व्या षटकात संघाचे शतक धावफलकावर लावले. दरम्यान स्टोक्सने आपले अर्धशतक पूर्ण केले. 

स्टोक्सला साथ देत असलेल्या संजू सॅमसननेही आपला गिअर बदलत धावांचा वेग वाढवला. या दोघांनी १५ व्या षटकात संघाला १५० चा टप्पा पार केला. संजू सॅमसनने २७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. स्टोक्स आणि सॅमसनने आपली आक्रमक फलंदाजी कायम ठेवत सामना बॉल टू रन असा आणला. राजस्थानला विजयसाठी आता २५ चेंडूत २५ धावांची गरज होती. दरम्यान, बेन स्टोक्स आपल्या शतकाच्या जवळ पोहचला होता. त्याने आपले शतक ५९ चेंडूत षटकार मारत स्टाईलमध्ये पूर्ण केले. या षटकाराबरोबरच राजस्थानला विजयासाठी ४ धावांची गरज होती ती स्टोक्सने पुढच्याच चेंडूवर चौकार मारून पूर्ण केली आणि सामना ८ विकेट राखून जिंकला. 

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत चांगली सुरुवात केली. फॉर्ममध्ये असलेला डिकॉक ( ६ ) स्वस्तात माघारी परतूनही मुबईने पॉवर प्लेमध्ये ५९ धावांपर्यंत मजल मारली. इशान किशन आणि सूर्यकुमार यादवने दुसऱ्या विकेटसाठी चांगली भागिदारी रचण्यास सुरुवात केली. किशनने एकेरी दुहेरीवर भर दिला तर सूर्यकुमारने आक्रमक पवित्र्यात फलंदाजी केली. या दोघांनी मुंबईला १० षटकात ८९ धावांपर्यंत पोहचवले.

पण, त्यानंतर राजस्थानच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करण्यास सुरुवात केली. कार्तिक त्यागीने ३७ धावांवर खेळत असलेल्या इशान किशनला बाद केले. त्याचा जोफ्रा आर्चरने अप्रतिम झेल पकडला. त्यांनतर मुंबईची धावगती मंदावली ही मंदावलेली धावगती वाढवण्याच्या नादात सूर्यकुमार यादव श्रेयस गोपळच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने २६ चेंडूत ४० धावा केल्या. गोपाळने पाठोपाठ मुंबईचा हंगामी कर्णधार कायरन पोलार्डचा त्रिफळा उडवत मुंबईला चौथा आणि मोठा धक्का दिला. 

या पडझडीनंतर सौरभ तिवारीने आणि हार्दिक पांड्याने मुंबईला सावरत धावगती वाढवली. सौरभ तिवारी आक्रमक ३४ धावा केल्यानंतर पांड्याने आपला दानपट्टा सुरु केला. त्याने २१ चेंडूत ६० धावा करुन मुंबईला २० षटकात १९५ धावांपर्यंत पोहचवले. 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT