IOA Election Results Pudhari
स्पोर्ट्स

IOA Election Results: आयओएच्या निवडणुकीत पी. टी. उषा यांना धक्का; सायना नेहवाल, अंजू बॉबी जॉर्ज विजयी

क्रीडापटूंच्या गुणवत्ता प्रतिनिधी निवडणुकीत सहा उमेदवारांपैकी चार महिलांची निवड

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पी. टी. उषा यांना सोमवारी झालेल्या क्रीडापटूंच्या उत्कृष्ट गुणवत्ता प्रतिनिधी (स्पोर्टस्‌पर्सन्स ऑफ आऊटस्टँडिंग मेरिट - एसओएम) निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला.

त्यामुळे आयओएच्या अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत बॅडमिंटनपटू सायना नेहवाल, माजी हॉकी कर्णधार राणी रामपाल, लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्ज आणि तिरंदाज डोला बॅनर्जी या चार महिला निवडून आल्या.

सहा उमेदवारांमध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत अंजू बॉबी जॉर्ज यांनी सर्वाधिक ५३ मते मिळवली. राणी रामपाल यांना ५०, डोला बॅनर्जी यांना ४५, तर सायना नेहवाल यांना ४३ मते मिळाली. पी. टी. उषा यांना ४०, तर माजी बास्केटबॉलपटू अनिता पॉल दुराई यांना केवळ सहा मते मिळाली. या निवडणुकीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलेल्या ८० क्रीडापटूंनी मतदान केले. मतदान प्रक्रिया ‘राईट टू व्होट’ या ऑनलाईन व्यासपीठावर पार पडली.

पुरुष गटातील एसओएम प्रतिनिधींची निवड यापूर्वीच बिनविरोध झाली. त्यामध्ये नेमबाज गगन नारंग, माजी बॉक्सर विजेंदर सिंग, कुस्तीपटू योगेश्वर दत्त आणि टेबल टेनिसपटू कमलेश मेहता यांचा समावेश आहे. या आठही जणांना आता ५ डिसेंबर रोजी होणाऱ्या आयओए निवडणुकीत अध्यक्षपदासह अन्य पदांसाठी निवडणूक लढवण्याची पात्रता मिळाली आहे.

उषा यांच्यासाठी अध्यक्षपदाची दुसरी टर्म मिळवण्याचा एक मार्ग बंद झाला असला, तरी राष्ट्रीय क्रीडा महासंघाच्या नामनिर्देशनातून आयओएच्या सर्वसाधारण सभेत प्रवेश मिळवण्याचा पर्याय खुला आहे. मात्र, हा पर्याय मिळण्याची शक्यता कमी असल्याचे वृत्तात नमूद करण्यात आले आहे.

डोला बॅनर्जी यांच्या विरोधात उषा यांची तक्रार

निवडणुकीच्या आदल्या दिवशी उषा यांनी निवडणूक अधिकारी संजय के. श्रीवास्तव यांच्याकडे डोला बॅनर्जी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. बॅनर्जी यांच्या नावाने व्हॉटस्‌ॲप संदेश प्रसारित करून ‘न्यू भारत पॅनेल’च्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आचारसंहितेतील कलम १.९ नुसार सोशल मीडियासह कोणत्याही माध्यमातून उमेदवारांचा प्रचार करण्यावर निर्बंध असल्याचे उषा यांनी तक्रारीत म्हटले होते.

खेळाडू आयोगाची निवडणूक बिनविरोध

दरम्यान, आयओएच्या खेळाडू आयोगाची निवडणूक मतदानाविना पार पडली. पी. व्ही. सिंधू, मीराबाई चानू, हरमनप्रीत सिंग, सलीमा टेटे, स्वप्निल कुसळे, भवानी देवी, तजिंदरपाल सिंग तूर, बॉम्बायला देवी, साजन प्रकाश आणि मनजीत सिंग यांचा आयोगात समावेश झाला. सिंधू यांची अध्यक्षपदी, तर हरमनप्रीत यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. चानू आणि साजन प्रकाश यांना आयओएच्या सर्वसाधारण सभेतील खेळाडू प्रतिनिधी म्हणून मतदानाचा अधिकार मिळणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT