स्पोर्ट्स

Japan Open : भारताचा लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये

Arun Patil

टोकियो, वृत्तसंस्था : जपान ओपन (Japan Open) बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनने दमदार कामगिरी करत सेमीफायनल गाठली. त्याने जपानच्या कोकी वातानाबेचा सरळ गेममध्ये पराभव केला. वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021 मध्ये कांस्यपदक पटकावणार्‍या 13 व्या स्थानावरील लक्ष्य सेनने जागतिक रँकिंगमध्ये 33 व्या स्थानावरील वातानाबेचा 21-15, 21-19 अशा सरळ गेममध्ये पराभूत केले.

सेनने 4 ते 9 जुलैदरम्यान झालेल्या कॅनडा आणि 11 ते 16 जुलैदरम्यान झालेल्या यूएस ओपन आणि आता जपान ओपन अशा सलग तीन स्पर्धांमध्ये लक्ष्य सेन सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे.

कॅनडाला ओपन सुपर 500 जिंकणार्‍या सेनने जपानच्या वातानाबेविरुद्धच्या सामन्यात पहिल्या गेमची 5-3 अशी सुरुवात केली. त्यानंतर ब्रेकपर्यंत त्याने 11-7 अशी आघाडी घेतली. पहिल्या गेममध्ये जपानच्या बॅडमिंटनपटूला फारसा प्रतिकार करता आला नाही. मात्र, दुसर्‍या गेममध्ये वातानाबेने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सेनने आपली लय बिघडू दिली नाही. एका वेळी सामना 18-17 असा अटीतटीचा झाला होता. मात्र, दोन रिटर्नसह लक्ष्यने मॅच पॉईंट मिळवला. यानंतर बॅकलाईनवर दमदार रिटर्नसह आपला विजय नोंदवला.

सात्विक – चिरागला पराभवाचा धक्का (Japan Open)

भारताची पुरुष दुहेरी जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी सध्या दमदार फॉर्ममध्ये आहेत. मात्र, त्यांना जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. ऑलिम्पिक चॅम्पियन तैवानची जोडी ली यांग आणि वांग ची लान यांनी 21-15, 23-25, 21-16 असा पराभव केला. या हंगामात सात्विक आणि चिरागने कोरिया ओपन सुपर 500, स्विस ओपन सुपर 300 आणि इंडोनेशिया ओपन सुपर 1000 टायटल जिंकले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT