स्पोर्ट्स

Asian Games 2026 : भारतीय महिला हॉकी संघाची फायनलमध्ये धडक! सुवर्णपदकासाठी २ ऑक्टोबरला चीनशी महामुकाबला

सेमीफायनलमध्ये दक्षिण कोरियाचा २-० ने धुव्वा, सुवर्णपदकासाठीचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपणार?

रणजित गायकवाड

आयची-नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मधील महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत भारतीय महिला हॉकी संघाने दक्षिण कोरियावर २-० अशी मात करत सुवर्णपदकाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. आता २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाअंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान चीनशी पडणार आहे. चीनने दुसऱ्या उपांत्य फेरीत जपानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशा फरकाने नमवत अंतिम फेरी गाठली आहे, तर कांस्यपदकासाठी जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात सामना रंगणार आहे.

दक्षिण कोरियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये तोडीस तोड संघर्ष पाहायला मिळाला. बचावात्मक पवित्रा आणि आक्रमक चढाया यामुळे पूर्वार्धातील दोन क्वार्टर संपेपर्यंत सामना गोलशून्य बरोबरीत सुटला होता. मात्र, तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय खेळाडूंनी आक्रमक रणनीती अवलंबत खेळावर पकड मिळवली. सामन्याच्या ४३व्या मिनिटाला भारताला अत्यंत महत्त्वाचा पेनल्टी कॉर्नर मिळाला. दीपिकाकडून अचूक मिळालेल्या पासवर इशिकाने कोणताही विलंब न लावता चेंडू थेट गोलजाळ्यात धाडला आणि प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकवत भारताचे खाते उघडले.

त्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच, म्हणजेच ४७व्या मिनिटाला भारतीय संघाने आघाडी दुप्पट केली. भारताची कर्णधार सलीमा टेटेने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेत चेंडूवर ताबा मिळवला, वेगाने 'डी' सर्कलमध्ये प्रवेश केला आणि मध्यभागी उत्कृष्ट पास दिला. हा चेंडू कोरियाच्या बचावफळीतील खेळाडूच्या स्टिकला लागून गोलजाळ्यात गेला, ज्यामुळे हा गोल कर्णधार सलीमाच्या नावावर नोंदवला गेला. या दोन महत्त्वपूर्ण गोलांच्या बळावर भारताने सामन्यात २-० अशी अजिंक्य आघाडी मिळवत दिमाखदार विजय साकारला.

गेल्या महिन्यात नेदरलँड्स येथे पार पडलेल्या एफआयएच विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत भारत आणि चीन आमनेसामने आले होते. त्यावेळी भारताने चीनला २-२ अशा बरोबरीत रोखले होते. त्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करत पाचवे स्थान पटकावले होते, जी १९७४ नंतरची भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. त्यामुळे आगामी अंतिम फेरीत भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असणार आहे.

या स्पर्धेतील भारताचा सध्याचा फॉर्म पाहता महिला हॉकी संघाकडून सुवर्णपदकाची मोठी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारतीय संघाने साखळी फेरीत प्रतिस्पर्धी संघांवर एकतर्फी वर्चस्व गाजवले होते. भारताने उझबेकिस्तानचा १९-०, इंडोनेशियाचा १७-१, थायलंडचा २०-१, जपानचा ३-१ आणि सिंगापूरचा ७-० असा धुव्वा उडवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली होती.

या ऐतिहासिक विजयानंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष ४४ वर्षांनंतरच्या सुवर्णपदकावर खिळले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचा समावेश १९८२ च्या नवी दिल्ली स्पर्धेत पहिल्यांदा करण्यात आला होता, त्यावेळी भारताने एकमेव सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर भारताने २०१८ मध्ये रौप्य आणि गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे तब्बल ४४ वर्षांचा सुवर्णपदकाचा दुष्काळ संपवून नवा इतिहास रचण्याची सुवर्णसंधी आता कर्णधार सलीमा टेटेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर चालून आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT