बटुमी, जॉर्जिया : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात एका ऐतिहासिक क्षणाची नोंद झाली आहे. अनुभवी बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी हिच्यानंतर, युवा ग्रँडमास्टर दिव्या देशमुखने देखील फिडे महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन भारतीय महिला खेळाडूंनी उपांत्य फेरीत स्थान मिळवले असून, ही भारतीय बुद्धिबळासाठी एक अभूतपूर्व कामगिरी मानली जात आहे.
दिव्याने आपल्यापेक्षा उच्च मानांकन असलेल्या अनुभवी सहकारी खेळाडू, ग्रँडमास्टर डी. हरिका यांचा टायब्रेकमध्ये 2-0 असा पराभव केला. या विजयासह तिने भारतीय बुद्धिबळात नव्या पर्वाची नांदी केली आहे. दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्यामुळे, सामन्याचा निकाल लावण्यासाठी रॅपिड टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. या निर्णायक क्षणी अनुभवी हरिका यांच्यावर मोठे दडपण होते, ज्याचा फायदा दिव्याने अचूकपणे उचलला.
दिव्याने अत्यंत निर्धाराने खेळत पहिला डाव जिंकला, ज्यामुळे हरिका हिच्यावरील दडपण अधिकच वाढले. दुसरा डाव जिंकून सामना बरोबरीत सोडवण्याचे आव्हान हरिका समोर होते, मात्र दिव्याने तिला कोणतीही संधी दिली नाही. दुसरा डावही जिंकत दिव्याने हा सामना आपल्या नावे केला आणि उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.
स्पर्धेत यापूर्वी कोनेरू हम्पीने उपांत्य फेरी गाठत हा टप्पा गाठणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान मिळवला होता. ही प्रतिष्ठित स्पर्धा जॉर्जियातील बटुमी येथे आयोजित करण्यात आली आहे.
दुसरीकडे, कोनेरू हम्पीने चीनच्या सॉन्ग युक्सिन हिचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान आधीच निश्चित केले होते. भारतीय खेळाडूने पहिला डाव जिंकला, तर दुसरा डाव अनिर्णित राखत विजय मिळवला. आता उपांत्य फेरीत तिची लढत चीनच्या लेई टिंगजी यांच्याशी होईल.
या स्पर्धेत प्रथमच भारताच्या चार महिला खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरी गाठून एक नवा विक्रम प्रस्थापित केला. यामध्ये कोनेरू हम्पी हिच्यासह हरिका द्रोणावल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. यावरून भारतीय महिला बुद्धिबळाची वाढती ताकद दिसून येते.
उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या आर. वैशाली रमेशबाबू हिला मात्र चीनच्या तिसऱ्या मानांकित खेळाडू तान झोंगयी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवासह तिची स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आली. वैशालीने कझाकस्तानच्या मेरुएर्त कमालिदेनोवा हिचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.