स्पोर्ट्स

Mirabai Chanu gold medal : ऐतिहासिक कामगिरी! मीराबाई चानूची राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकाची हॅटट्रिक

Commonwealth Games 20626 : महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

रणजित गायकवाड

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (कॉमनवेल्थ गेम्स) ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले आहे. महिलांच्या ४८ किलो वजनी गटात तिने विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकण्याचा दुर्मिळ पराक्रम मीराबाईने केला आहे.

३१ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८५ किलो वजन उचलून राष्ट्रकुल स्पर्धा आणि राष्ट्रकुल क्रीडा प्रकारातील नवा विक्रम प्रस्थापित केला. त्यानंतर क्लीन अँड जर्क प्रकारात १०५ किलो वजन उचलत तिने या प्रकारातही स्पर्धेतील नव्या विक्रमाची नोंद केली. एकूण १९० किलो वजन उचलून तिने या स्पर्धेचे सुवर्णपदक पटकावले आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मीराबाईचे हे सलग तिसरे सुवर्णपदक ठरले आहे. यापूर्वी तिने २०१८ आणि २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्येही सुवर्णपदक जिंकले होते. टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या मीराबाईने २०१४ मध्ये ग्लासगो येथेच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदक जिंकून आपल्या आंतरराष्ट्रीय यशाची सुरुवात केली होती. त्याच भूमीत पुन्हा एकदा ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकून तिने भारताच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी आपले नाव कोरले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT