मलेशिया : सुलतान अझलन शाह चषक स्पर्धेतील पावसाचा व्यत्यय आलेल्या आणि मंगळवारी पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाने कडवी झुंज दिली. मात्र, त्यांना बेल्जियमविरुद्ध 2-3 असा निसटता पराभव पत्करावा लागला.
भारताकडून अभिषेक (33 वे मिनिट) आणि शिलानंद लाकरा (57 वे मिनिट) यांनी, तर बेल्जियमसाठी रोमन डुवेकोट (17 वे आणि 46 वे मिनिट) आणि निकोलस डी केरपेल (45 वे मिनिट) यांनी गोल केले.
भारताने सामन्याची सुरुवात अत्यंत निर्धाराने केली. भारतीय गोलकीपर पवनने उत्कृष्ट कामगिरी करत संघाला बरोबरीत ठेवले. सामन्याच्या दहाव्या मिनिटाला बेल्जियमला पेनल्टी कॉर्नरच्या रूपाने पहिली संधी मिळाली, त्यानंतर लगेचच दुसरी संधी मिळाली; परंतु भारतीय बचावफळीने भक्कम बचाव करत पहिला क्वार्टर गोलशून्य बरोबरीत राखला.
दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक पवित्रा घेत अचूक पासिंगद्वारे गोल करण्याच्या संधी शोधल्या. मात्र, बेल्जियमने आघाडी घेतली. 17 व्या मिनिटाला रोमन डुवेकोट याने गोल करत पवनचा प्रतिकार मोडून काढला. भारताने सातत्याने प्रयत्न करूनही मध्यंतरापर्यंत बेल्जियमने 1-0 अशी आघाडी कायम राखली.
दुसऱ्या सत्रात भारताने जोरदार मुसंडी मारली. 33 व्या मिनिटाला अभिषेकने एका उत्कृष्ट चालीचे गोलमध्ये रूपांतर करत सामना 1-1 अशा बरोबरीत आणला. मात्र, दुर्दैवाने 45 व्या मिनिटाला निकोलस डी केरपेलने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत बेल्जियमला पुन्हा आघाडी मिळवून दिली होती.