स्पोर्ट्स

King Charles III meets Team India : राजेशाही आदरातिथ्य! लॉर्ड्स कसोटीनंतर किंग चार्ल्स III यांनी घेतली टीम इंडियाची भेट

किंग चार्ल्स यांनी आकाश दीपच्या आजारी बहिणच्या प्रकृतीचीही आपुलकीने चौकशी केली. ‘लॉर्ड्स’ कसोटीतील पराभवावरही झाली चर्चा.

रणजित गायकवाड

indian mens and women cricket teams meet britain king charles iii

लंडन : भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनी इंग्लंडचे राजे, किंग चार्ल्स तृतीय यांची सेंट जेम्स पॅलेस येथे भेट घेतली. लॉर्ड्स येथील कसोटी सामन्यानंतर हा भेट-संवाद पार पडला.

भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, उभय संघांमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत इंग्लंड सध्या 2-1 अशा फरकाने आघाडीवर आहे. लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर 22 धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यानंतर किंग चार्ल्स यांनी भारतीय संघाला भेटीचे विशेष निमंत्रण दिले होते.

किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या या विशेष भेटीवेळी कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, के. एल. राहुल आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित होते. संघासोबत बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. या भेटीनंतर किंग चार्ल्स यांनी सर्व खेळाडूंसोबत फोटो सेशनही पार पडले.

किंग चार्ल्स यांच्या भेटीवर शुभमन गिलची प्रतिक्रिया

किंग चार्ल्स यांना भेटल्यानंतर भारतीय खेळाडू अत्यंत आनंदित दिसले. या भेटीविषयी बोलताना कर्णधार शुभमन गिल म्हणाला, ‘किंग चार्ल्स तृतीय यांनी आम्हाला भेटीसाठी बोलावले, ही आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे.’ गिलने पुढे सांगितले की, ‘लॉर्ड्स कसोटीत आमचा शेवटचा फलंदाज ज्याप्रकारे बाद झाला, ते दुर्दैवी होते, असे किंग चार्ल्स म्हणाले. तो सामना आमच्या नशिबात नव्हता, मात्र आगामी सामन्यांमध्ये नशीब नक्कीच आमची साथ देईल, अशी आशा आम्ही व्यक्त केली.’

हरमनप्रीत कौरचा अनुभव : ‘किंग चार्ल्स अत्यंत मनमिळाऊ’

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने देखील हा अनुभव विशेष असल्याचे म्हटले. ती म्हणाली, ‘किंग चार्ल्स यांच्याशी आमची ही पहिलीच भेट होती. ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे आहेत. आम्ही सध्या उत्कृष्ट क्रिकेट खेळत असून, स्वतःला सिद्ध करण्याची आम्हाला चांगली संधी मिळत आहे.’

राजीव शुक्ला म्हणाले...

याप्रसंगी बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, ‘जेव्हा किंग चार्ल्स यांनी भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाला भेटीसाठी आमंत्रित केले, तो एक ऐतिहासिक क्षण होता. त्यांना भेटून खेळाडू अत्यंत आनंदित झाले आहेत. किंग यांनी मी त्यांना दिलेल्या पुस्तकाविषयी विचारणा केली. इतकेच नव्हे, तर भारतीय क्रिकेटपटू आकाश दीपच्या कर्करोगाशी झुंज देणा-या बहिणच्या प्रकृतीचीही किंग चार्ल्स यांनी आपुलकीने चौकशी केली.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT