भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची निवृत्तीची घोषणा File Photo
स्पोर्ट्स

भारताची ऑलिम्पियन जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची निवृत्तीची घोषणा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताची स्टार जिम्नॅस्ट दीपा कर्माकर हिने आज (दि.७) निवृत्ती जाहीर केली. ही माहिती तिने तिच्या सोशल मीडिया 'एक्स'च्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली. 31 वर्षीय दीपा 2016 च्या रिओ ऑलिम्पिकच्या व्हॉल्ट स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिली. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी ती भारताची पहिलीच महिला जिम्नॅस्ट ठरली होती.

31 वर्षीय दीपा कर्माकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली. तिने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, 'खूप विचार केल्यानंतर, मी जिम्नॅस्टिकमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय माझ्यासाठी सोपा नव्हता, पण हीच योग्य वेळ आहे. जिम्नॅस्टिक हा माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग आहे आणि मी प्रत्येक क्षणासाठी कृतज्ञ आहे', असे तिने म्हटले आहे.

रिओ ऑलिम्पिक माझ्या कारकिर्दीतील संस्मरणीय क्षण

दीपा कर्माकर पुढे लिहितात, 'मला आठवते ती पाच वर्षांची दीपा, जिला सांगण्यात आले होते की, तिच्या सपाट पायांमुळे ती कधीच जिम्नॅस्ट होऊ शकत नाही. आज मला माझ्या कामगिरीचा खूप अभिमान वाटतो. जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि पदके जिंकणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिओ ऑलिम्पिकमध्ये प्रोड्युनोव्हा व्हॉल्ट कामगिरी करणे हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण ठरल्याचे दीपाने स्पष्ट केले.

जिम्नॅस्टिकशी असलेलं नातं कधीही तुटणार नाही; दीपा

'माझा शेवटचा विजय, आशियाई जिम्नॅस्टिक चॅम्पियनशिप ताश्कंद हा एक टर्निंग पॉईंट होता. कारण तोपर्यंत मला वाटले की मी माझ्या शरीराला आणखी पुढे ढकलू शकेन. परंतु कधीकधी आपले शरीर आपल्याला सांगते की, ही विश्रांती घेण्याची वेळ आली आहे. परंतु हृदय अजूनही सहमत नाही. मी निवृत्त होत असलो तरी माझा जिम्नॅस्टिकशी असलेला संबंध कधीही तुटणार नाही. मला या खेळाला काहीतरी परत मिळवून द्यायचे आहे, कदाचित ते मार्गदर्शन करून, प्रशिक्षण देऊन, माझ्यासारख्या इतर मुलींना पाठिंबा देऊन असल्याचे तिने म्हटले आहे.

'दीपा कर्माकर' भारतातील अव्वल जिम्नॅस्ट

त्रिपुराची दीपा कर्माकर ही भारतातील अव्वल जिम्नॅस्टपैकी एक आहे. ऑलिम्पिकसोबतच तिने इतर अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये देशाला गौरव मिळवून दिले. 2018 मध्ये, तिने तुर्कीमधील मर्सिन येथे झालेल्या FIG आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स वर्ल्ड चॅलेंज कपच्या व्हॉल्ट स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अशी कामगिरी करणारी ती भारतातील पहिली जिम्नॅस्ट ठरली. आशियाई चॅम्पियनशिपमध्येही तिने एकूण 2 पदके जिंकली. फेब्रुवारी 2023 मध्ये दीपा कर्माकर डोप टेस्टमध्ये नापास झाली होती. याच कारणामुळे तिच्यावर खेळण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. 10 जुलै 2023 पर्यंत तिच्यावरील बंदी कायम होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT