दोहा; वृत्तसंस्था : ‘फिडे’ जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या अर्जुन एरिगेसी आणि कोनेरू हंपी यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात ऐतिहासिक कांस्यपदकावर आपली मोहोर उमटवली. या स्पर्धेत दिग्गज खेळाडू मॅग्नस कार्लसन आणि अलेक्झांड्रा गोर्याचकिना यांनी या स्पर्धेत जेतेपदावर नाव कोरले.
मॅग्नस कार्लसनने 10.5 गुणांसह कारकिर्दीतील सहाव्यांदा जागतिक रॅपिड बुद्धिबळ विजेतेपदाला गवसणी घातली. 13 फेर्यांच्या अखेरीस व्लादिस्लाव आर्टेमिएव्ह, अर्जुन एरिगेसी, हॅन्स मोके निमन आणि लेनियर डोमिन्गेझ पेरेझ या चार खेळाडूंचे प्रत्येकी 9.5 गुण झाल्याने दुसर्या स्थानासाठी चुरस निर्माण झाली होती. अर्जुनने अखेरच्या फेरीत अलेक्झांडर शिमानोव्हवर महत्त्वपूर्ण विजय मिळवत 9.5 गुणांचा टप्पा गाठला.
टाय-ब्रेकर नियमानुसार 105.5 गुणांसह आर्टेमिएव्हने दुसरे, तर 98 गुणांसह अर्जुनने तिसरे स्थान पटकावून कांस्यपदक निश्चित केले. निमन (97.5) आणि डोमिन्गेझ (95.5) यांना पदकाने हुलकावणी दिली. इतर भारतीय खेळाडूंमध्ये अरविंद चिदंबरम (16 वे), निहाल सरिन (19 वे), डोम्माराजू गुकेश (20 वे) आणि रमेशबाबू प्रज्ञानंद (28 वे) या सर्वांनी प्रत्येकी 8.5 गुण मिळवले. अंतिम फेरीत कार्लसनने अनिश गिरीसोबत, तर आर्टेमिएव्हने अमेरिकेच्या वेस्ली सो सोबत डाव बरोबरीत सोडवला.
महिला गटात भारताची अनुभवी खेळाडू कोनेरू हंपी, अलेक्झांड्रा गोर्याचकिना आणि चीनची झू जिनर या तिघींचे 11 फेर्यांअखेर 8.5 गुण झाले होते. टाय-ब्रेकरनुसार झू प्रथम, गोर्याचकिना द्वितीय, तर हंपी तृतीय स्थानावर राहिली. त्यानंतर झालेल्या टाय-ब्रेकर लढतीत गोर्याचकिनाने झू जिनरचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या कांस्यपदकासह 38 वर्षीय हंपीने आपल्या पदकतालिकेत आणखी एका पदकाची भर घातली आहे. तिने यापूर्वी 2019 आणि 2024 मध्ये सुवर्णपदके जिंकली होती. अखेरच्या फेरीत हंपीला भारताच्याच बी. सविता श्रीने बरोबरीत रोखले. सविता श्री, आर. वैशाली आणि तुर्कीची एकाटेरिना अतालिक हे खेळाडू 8 गुणांसह चौथ्या स्थानावर राहिले.
पाच वेळचा जागतिक रॅपिड विजेता मॅग्नस कार्लसनने ही स्पर्धा जिंकली असली तरी साखळी फेरीत रशियन ग्रँडमास्टर व्लादिस्लाव आर्टेमिएव्हकडून झालेल्या धक्कादायक पराभवानंतर त्याचा संयम सुटला आणि त्याने रागाच्या भरात कॅमेरामनला ढकलून देणे वादाला निमंत्रण देणारे ठरले. स्पर्धेच्या सातव्या फेरीत आर्टेमिएव्हने कार्लसनवर मात केली. या अनपेक्षित पराभवामुळे कार्लसन कमालीचा अस्वस्थ झाला आणि रागाच्या भरात स्पर्धा कक्षातून बाहेर पडला. सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका चित्रफितीत (व्हिडीओ), कार्लसन हॉलमधून बाहेर पडत असताना एक कॅमेरामन त्याच्या मागे जात असल्याचे दिसून आले. यावेळी प्रचंड संतापलेल्या कार्लसनने त्या कॅमेरामनला रागाने बाजूला ढकलून दिले आणि आपली नाराजी व्यक्त केली होती.