स्पोर्ट्स

Vaibhav sooryavanshi : वैभव सूर्यवंशी राजस्थान रॉयल्सला कसा मिळाला होता? ‘त्या’ एका मेसेजने गवसला क्रिकेटचा नवा 'सुपरस्टार'

१५७ किमी वेगाच्या चेंडूवर षटकार खेचून सिद्ध केली होती आपली क्षमता

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) च्या हंगामात १५ वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने आपल्या स्फोटक फलंदाजीने पुन्हा एकदा संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याने अनुभवी गोलंदाजांची दाणादाण उडवली असून, सध्या तो देशातील सर्वात चर्चेत असलेला खेळाडू बनला आहे. विशेषतः जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांसारख्या जगातील सर्वोत्तम गोलंदाजांच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत त्याने आपल्यातील निर्भयता सिद्ध केली आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळताना त्याने अवघ्या १४ चेंडूत ३९ धावांची झंझावाती खेळी केली, ज्यात बुमराहच्या गोलंदाजीवर त्याने दोन उत्तुंग षटकार लगावले.

टॅलेंट स्काउट अक्षय करंजे यांची पारखी नजर

वैभव सूर्यवंशी आज ज्या उंचीवर आहे, त्यामागे राजस्थान रॉयल्सचे टॅलेंट स्काउट अक्षय करंजे यांची महत्त्वाची भूमिका आहे. अक्षय यांनीच या हिऱ्याला पारखून राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात आणले. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, २०२२-२३ च्या सुमारास अक्षय करंजे यांनी राजस्थान रॉयल्सच्या अंतर्गत ग्रुपवर एक मेसेज केला होता. या मेसेजमध्ये त्यांनी एका 'अद्भुत आणि विलक्षण' गुणवत्ता असलेल्या युवा खेळाडूचा उल्लेख केला होता. त्यांच्या या एका मेसेजमुळे संघ व्यवस्थापनाने वैभवची दखल घेतली.

१० कोटींचा विश्वास आणि जुबिन भरूचा यांची पसंती

अक्षय करंजे यांच्या माहितीनंतर फ्रँचायझीने तत्काळ हालचाली केल्या आणि वैभवची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. जेव्हा राजस्थान रॉयल्सचे क्रिकेट संचालक जुबिन भरूचा यांनी वैभवला पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहिले, तेव्हा ते अक्षरशः थक्क झाले. ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, जुबिन भरूचा वैभवच्या कौशल्यावर इतके फिदा झाले होते की, त्यांनी संघ मालकांना वैभवसाठी लिलावात १० कोटी रुपयांपर्यंतची तरतूद ठेवण्यास सुचवले होते.

१५८ किमी वेगाचा यशस्वी सामना

वैभवची खरी परीक्षा महाराष्ट्रातील तळेगाव येथील राजस्थान रॉयल्सच्या अकादमीमध्ये झाली. या चाचणी दरम्यान त्याने कर्नाटकच्या एका वेगवान गोलंदाजाचा सामना करताना पहिल्याच चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरवरून षटकार मारला. त्यानंतर त्याची क्षमता अधिक तपासण्यासाठी त्याला 'साईड आर्म थ्रोअर्स'चा सामना करण्यास सांगण्यात आले. एका ६ फूट ४ इंच उंचीच्या थ्रोअरने १५७ ते १५८ किमी प्रतितास वेगाने फेकलेल्या चेंडूवर वैभवने थेट साईटस्क्रीनवर षटकार ठोकला. या एका फटक्याने त्याचे संघातील स्थान निश्चित केले.

राजस्थान रॉयल्सने २०२५ च्या लिलावात अवघ्या १३ व्या वर्षी वैभवला १.१ कोटी रुपयांच्या बोलीवर आपल्या संघात सामील केले होते. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीची दिमाखात सुरुवात केली.

गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व

दरम्यान, आयपीएल २०२६ च्या १४ व्या सामन्यानंतर राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे. दिल्ली कॅपिटल्सला या हंगामातील पहिल्या पराभवाचा धक्का बसला असून, गुजरात टायटन्सने विजयाचे खाते उघडले आहे. सध्या ऑरेंज कॅप यशस्वी जयस्वालकडे असून पर्पल कॅपवर रवी बिश्नोईने कब्जा मिळवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT