नवी दिल्ली: पहिल्या खो-खो विश्वचषकात भारताने जगज्जेतेपद पटकावले. भारताच्या महिला आणि पुरुष या दोन्ही खो-खो संघांनी अंतिम सामन्यात विजय मिळवत विश्वचषकावर नाव कोरले. भारताच्या महिला संघाने नेपाळच्या महिला संघाचा, तर पुरुष संघाने नेपाळच्या पुरुष संघाचा अंतिम सामन्यात पराभव केला. दिल्लीतील इंदिरा गांधी मैदानामध्ये पहिल्या खो-खो विश्वचषकाचे आयोजन १६ ते १९ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते. यामध्ये एकूण २० देशांच्या संघांनी सहभाग घेतला. या विश्वचषकादरम्यान प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.
रविवारी, पहिल्यांदा भारत आणि नेपाळ या महिला संघाचा अंतिम सामना झाला. त्यानंतर पुरुष संघाचा सामना झाला. वेग, रणनीती आणि कौशल्याच्या आधारावर, भारतीय महिला संघाने खो खो विश्वचषक २०२५ ला गवसणी घालत जेतेपदावर भारताचे नाव कोरले. नेपाळवर ७८-४० च्या जोरदार गुणांसह विजयावर शिक्कामोर्तब करत भारताने नेपाळवर वर्चस्व राखले. सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने वर्चस्व गाजवले. भारतीय महिला संघाची कर्णधार प्रियंका इंगळेने सामन्यांमध्ये शानदार कामगिरी केली.
महिलांच्या अंतिम सामन्यात सर्वोत्कृष्ट आक्रमणकर्ता म्हणून भारताच्या 'अंशु कुमारी', सर्वोत्कृष्ट बचावपटू म्हणून नेपाळच्या 'मनमती धानी' तर सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार भारताच्या 'चैत्रा बी' ने पटकावला.
पुरुष संघांचा अंतिम सामना भारत आणि नेपाळ यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय पुरुष संघाने नेपाळवर ५४-३६ गुणांसह विजेतेपद पटकावले.
खो खो विश्वचषकात मुळची बीडची असलेली प्रियंका इंगळे भारतीय महिला संघाची कर्णधार आहे. प्रियंकांच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाने विश्वचषक जिंकला. यावेळी 'बिडची खरी ओळख कर्णधार प्रियंका इंगळे' अशा आशयाचे फलक मैदानात झळकले.
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 'खो- खो'चे लक्ष्य आता ऑलिम्पिक असा मजकूर लिहिलेले बॅनर घेऊन कोल्हापूरातील क्रिडाप्रेमी सामना बघायला आले होते. कोल्हापूरसारख्या मातीतून मॅटवर आलेले खो- खो, कबड्डी सारखे खेळ ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावेत, यासाठी या बॅनरच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न करत असल्याचे कोल्हापुरातून आलेले रोहित वाळके, अक्षय पाटील, रणजित पाटील म्हणाले.