अहमदाबाद; वृत्तसंस्था : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि सर्वात मौल्यवान खेळाडू रवींद्र जडेजाने आपल्या अष्टपैलू खेळाचे पुन्हा एकदा जबरदस्त प्रदर्शन केले. प्रथम फलंदाजीत नाबाद शतक झळकावल्यानंतर, दुसर्या डावात भेदक गोलंदाजी करत चार महत्त्वपूर्ण बळी घेत त्याने भारताला पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर एक डाव आणि 140 धावांनी मोठा विजय मिळवून दिला. भारताच्या भेदक मार्यापुढे विंडीजचा संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सामना तिसर्याच दिवशी भारताच्या नावे झाला. या विजयासह भारताने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिज संघाने पहिल्या डावात अवघ्या 162 धावा केल्या. त्यानंतर के. एल. राहुल, ध्रुव जुरेल आणि रवींद्र जडेजा यांच्या शतकांच्या जोरावर भारताने आपला पहिला डाव 5 बाद 448 धावांवर घोषित केला. त्यामुळे भारताने वेस्ट इंडिजवर 286 धावांची मोठी आघाडी घेतली होती. या धावसंख्येच्या डोंगराखाली दबलेल्या वेस्ट इंडिज संघाची दुसर्या डावातही अत्यंत निराशाजनक कामगिरी झाली. संपूर्ण संघ अवघ्या 45.1 षटकांत 146 धावांवर गारद झाला. दुसर्या डावात रवींद्र जडेजाने 54 धावांत 4 बळी घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.
भारताच्या विशाल धावसंख्येत तीन फलंदाजांच्या शतकी खेळीचा मोलाचा वाटा होता. सलामीवीर के. एल. राहुलने (100) तब्बल नऊ वर्षांनंतर मायदेशात कसोटी शतक झळकावत आपला शतकाचा दुष्काळ संपवला. यष्टिरक्षक-फलंदाज ध्रुव जुरेलने (125) आपले पहिले कसोटी शतक साजरे केले. जडेजाने आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवत (104) नाबाद शतक झळकावले आणि संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले.
तिसर्या दिवशी सकाळी भारताने डाव घोषित करताच विजयाचे संकेत दिले होते. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने अप्रतिम झेलमुळे पहिली विकेट मिळवली, पण त्यानंतर फिरकीपटूंनी सामन्याची सूत्रे हाती घेतली. रवींद्र जडेजाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात विंडीजच्या अव्वल फळीला अडकवले. त्याने जॉन कॅम्पबेल (14), ब्रँडन किंग (5) आणि शाई होप यांना बाद करत विंडीजची अवस्था 5 बाद 66 अशी केली.
उपाहारानंतर सिराजने एकाच षटकात जस्टिन ग्रीव्हज (25) आणि जोमेल वॉरिकन (0) यांना बाद करून विंडीजच्या उरल्यासुरल्या आशाही संपवल्या. वॉशिंग्टन सुंदर (1/18) आणि कुलदीप यादव (2/23) यांनीही प्रत्येकी बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाने या सामन्यात शतक आणि चार बळी घेण्याची कामगिरी केली, पण एकाच कसोटीत शतक आणि पाच बळी घेण्याचा पराक्रम तो थोडक्यात हुकला. आता मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 10 ते 14 ऑक्टोबरदरम्यान नवी दिल्ली येथे खेळवला जाईल.
या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाने फलंदाजी आणि गोलंदाजीत आपली छाप पाडली. त्याने भारताच्या पहिल्या डावात नाबाद 104 धावा केल्या, जे त्याचे सहावे कसोटी शतक होते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या दुसर्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या. जडेजाच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 3,990 धावा आणि 334 विकेट्स आहेत. तो आता कसोटीत 4,000 धावा आणि 300 विकेट्स घेणार्या अष्टपैलू खेळाडूंच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या अगदी जवळ आहे. त्याला ही कामगिरी करण्यासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे. आतापर्यंत फक्त कपिल देव (भारत) आणि डॅनियल व्हेटोरी (न्यूझीलंड) यांनी हा टप्पा गाठला आहे.
या सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम ठेवले. खेळपट्टीने तिन्ही दिवस वेगवेगळे रंग दाखवले, पण भारतीय खेळाडूंनी प्रत्येक परिस्थितीचा पुरेपूर फायदा उचलला.
1. पहिला दिवस : वेगवान गोलंदाजांना मदत करणार्या खेळपट्टीवर मोहम्मद सिराज (4/40 आणि 3/31) आणि जसप्रीत बुमराह (3/42) यांनी विंडीजच्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावले.
2. दुसरा दिवस : फलंदाजीसाठी अनुकूल झालेल्या खेळपट्टीवर भारतीय फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला. तिघांनी शतके झळकावली.
3. तिसरा दिवस : फिरकीला साथ देणार्या खेळपट्टीवर जडेजा आणि इतर फिरकी गोलंदाजांनी विंडीजचा दुसरा डाव लवकर गुंडाळला.
प्रामाणिकपणे सांगायचे तर, हा आमच्यासाठी एक परिपूर्ण सामना होता. संघातून तीन शतके झाली आणि आम्ही क्षेत्ररक्षणही खूप चांगले केले, त्यामुळे कोणतीही तक्रार नाही.शुभमन गिल, कर्णधार, भारत