स्पोर्ट्स

भारतीय महिला संघाचा दणदणीत विजय; दक्षिण आफ्रिकेला 143 धावांनी हरवले

Shambhuraj Pachindre

बंगळूर; वृत्तसंस्था : भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला यांच्यात रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने 143 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताच्या विजयात स्मृती मानधना आणि आशा शोभनाने मोलाचा वाटा उचलला. स्मृतीने शतक (117) झळकावले तर पदार्पण करणार्‍या आशाने 4 विकेटस् घेतल्या.

भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर 266 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाने स्मृतीच्या शतकाच्या जोरावर 50 षटकांत 8 बाद 265 धावा केल्या. भारताकडून स्मृतीव्यतिरिक्त दीप्ती शर्माने 37 आणि पूजा वस्त्राकरने नाबाद 31 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. बाकी कोणाला 20 धावाही पार करता आल्या नाहीत. दक्षिण आफ्रिकेकडून आयाबोंगा खाकाने सर्वाधिक 3 विकेटस् घेतल्या. तसेच मसाबाता क्लासने 2 विकेटस् घेतल्या, तर अ‍ॅनेरी डर्कसेन, नॉनकुलुलेको एमलाबा आणि शांगासे यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. हे आव्हान पाहुण्या संघाला पेलेले नाही. त्यांचा डाव 122 धावांत आटोपला. त्यांच्याकडून सुन लुसने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली.

स्मृती मानधनाचे धडाकेबाज शतक

भारतीय महिला आणि दक्षिण आफ्रिका महिला संघात रविवारी झालेल्या वन डे सामन्यात स्मृती मानधनाने शतक करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली. यावेळी उपकर्णधार स्मृती मानधनाने 127 चेंडूंत 12 चौकार आणि 1 षटकारासह 117 धावांची शानदार शतकी खेळी केली. हे तिचे वन डे कारकिर्दीतील सहावे शतक ठरले. यासह तिने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 7000 धावा पूर्ण करण्याचा टप्पाही पार केला.

स्मृती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावा करणारी जगातील सहावी, तर भारताची दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. भारताकडून यापूर्वी असा विक्रम मिताली राज हिने केला आहे. तसेच शारलोट एडवर्डस्, सुझी बेटस्, स्टिफानी टेलर, मेग लेनिंग या महिला क्रिकेटपटूंनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. स्मृतीने वन डेमध्ये 6 वे शतक झळकावल्याने हरमनप्रीत कौरच्या 5 शतकांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. वन डेमध्ये भारतीय महिला संघाकडून सर्वाधिक वन डे शतके करणार्‍या खेळाडूंच्या यादीत आता स्मृती दुसर्‍या क्रमांकावर आली आहे. या यादीत 7 शतकांसह मिताली राज अव्वल क्रमांकावर आहे.

SCROLL FOR NEXT