पुढारी ऑनलाईन डेस्क : डब्ल्यूपीएलनंतर ब्रेकवर असलेल्या टीम इंडियाचा महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यास सज्ज झाला आहे. या महिन्याच्या 27 तारखेपासून भारतीय संघ एकदिवसीय तिरंगी मालिका खेळण्यास मैदानात उतरणार आहे. ही मालिका श्रीलंकेत खेळवली जाणार असून यात यजमान संघाव्यतिरिक्त द. आफ्रिका संघ सहभागी होत आहे. दरम्यान, बीसीसीआय महिला निवड समितीने मंगळवारी (8 एप्रिल) या मालिकेसाठी टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. संघाचे नेतृत्व पुन्हा एकदा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तर स्मृती मानधना हिच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी असेल.
ही तिरंगी मालिका 27 एप्रिलपासून सुरू होईल आणि 11 मे पर्यंत चालेल. सर्व सामने सामने कोलंबो येथील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जातील. उद्घाटनाचा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात रंगणार आहे. डबल राउंड रॉबिन स्वरूपात ही मालिका खेळवली जाईल. प्रत्येक संघ चार-चार सामने खेळेल आणि पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ 11 मे रोजी अंतिम सामन्यात भिडतील. 29 एप्रिल रोजी टीम इंडियासमोर द. आफ्रिकेचे आव्हान असेल. तर पुढील दोन सामने 4 मे आणि 7 मे रोजी अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होतील.
या मालिकेतून हरमनप्रीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. या आधी जानेवारीमध्ये आयर्लंडविरुद्धच्या घरच्या एकदिवसीय मालिकेत तिला दुखापतीच्या कारणास्तव विश्रांती देण्यात आली होती. पण आता ती पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि संघाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. हरमनप्रीतला यापूर्वी डिसेंबर 2024 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान गुडघ्याला दुखापत झाली होती. त्याआधी टी-20 विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातही तिला मानेला दुखापत झाली होती. तथापि, तिने अलीकडेच महिला प्रीमियर लीगमध्ये शानदार पुनरागमन केले आणि मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करत जेतेपद मिळवले.
भारतीय संघाची वेगवान गोलंदाज रेणुका सिंह ठाकूर आणि तितस साधू यांना दुखापतीमुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. रेणुका गेल्या काही काळापासून पाठदुखीने त्रस्त आहे, तर तितस देखील तंदुरुस्त नाही. तर शेफाली वर्माला पुन्हा संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. रेणुका सिंहला आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठीही विश्रांती देण्यात आली होती, परंतु त्यापूर्वी तिने वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 10 विकेट्स घेत मालिकावीराचा पुरस्कार जिंकला होता.
मालिकेसाठी बहुतेक अनुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. हरमन आणि स्मृती यांच्याव्यतिरिक्त प्रतिका रावल, हरलीन देओल आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांची फलंदाजी विभागात निवड करण्यात आली आहे. त्याच वेळी, रिचा घोष आणि यास्तिका भाटिया यष्टीरक्षक म्हणून संघाचा भाग आहेत.
दरम्यान, संघात तीन नव्या खेळाडूंनी स्थान निश्चित केले आहे. यात काशवी गौतम, श्री चरणी आणि शुचि उपाध्याय यांचा समावेश आहे. या तिन्ही खेळाडूंनी आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. डावखुरी फिरकी गोलंदाज श्री चरणी WPL मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग होती. तिने या हंगामात 4 विकेट घेतल्या. वेगवान गोलंदाज शुचि उपाध्यायने चॅलेंजर ट्रॉफीमध्ये 18 विकेट्स घेऊन चमकदार कामगिरी केली आहे. गुजरात जायंट्सची वेगवान गोलंदाज काशवी गौतमने WPL 2025 मध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. संघात अनुभवी आणि युवा उत्साही खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे, त्यामुळे या तिरंगी मालिकेत भारतीय संघाकडून चमकदार कामगिरी होण्याची अपेक्षा आहे.
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), यस्तिका भाटिया (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, अमनज्योत कौर, काशवी गौतम, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, तेजल हसबनीस, श्री चरणी, शुचि उपाध्याय.