तिरुवनंतपूरम; वृत्तसंस्था : हरमनप्रीत कौरची 43 चेंडूंतील 68 धावांची आक्रमक अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांच्या चतुरस्त्र मार्याच्या बळावर भारतीय महिला संघाने येथील पाचव्या व शेवटच्या टी-20 सामन्यातही प्रतिस्पर्धी यजमान संघाचा पुन्हा एकदा धोबीपछाड केला आणि ही मालिका 5-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. भारताने 5-0 अशा एकतर्फी फरकाने मालिका जिंकण्याची ही एकूण तिसरी आणि मायभूमीतील पहिली वेळ ठरली. प्रारंभी, भारताने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 175 धावा केल्या, तर प्रत्युत्तरात लंकेला 7 बाद 160 धावांवर समाधान मानावे लागले.
विजयासाठी 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लंकेतर्फे हसिनी पेरेरा (42 चेंडूंत 65) व इमेशा दुलानी (39 चेंडूंत 50) यांनी दुसर्या गड्यासाठी 79 धावांची दमदार भागीदारी साकारली. मात्र, इतका अपवाद वगळता लंकेच्या अन्य एकाही फलंदाजाला फारसा प्रतिकार करता आला नाही आणि त्यांना 15 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. भारताने या लढतीत दीप्ती, अरुंधती, स्नेह राणा, वैष्णवी, श्री चरणी व अमनजोत असे 7 गोलंदाज आजमावले आणि या सर्व गोलंदाजांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रारंभी, एका बाजूने ठरावीक अंतराने गडी बाद होत असतानाही हरमनप्रीत कौरने सर्वस्व पणाला लावत साकारलेल्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर भारताने 20 षटकांत 7 बाद 175 धावांचा डोंगर उभारला. हरमनप्रीतने 43 चेंडूंत जलद 68 धावा फटकावल्या. तिच्या या शानदार खेळीत 9 चौकार व एका षटकाराचा समावेश राहिला. शेवटच्या टप्प्यात अमनजोत कौरने 18 चेंडूंत 21 धावा केल्या, तर अरुंधती रेड्डीने 11 चेंडूंत 4 चौकार व एका षटक ारासह जलद 27 धावांचे योगदान दिले.
लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर भारताची अगदीच खराब सुरुवात झाली. शफाली वर्मा, पदार्पणवीर कमलिनी व हरलीन या आघाडीच्या पहिल्या तिन्ही फलंदाजांना स्वस्तात बाद होत परतावे लागले होते.
भारताची ऑफ ब्रेक गोलंदाज दीप्ती शर्माने निलाक्षिकाला बाद करत टी-20 कारकिर्दीत सर्वाधिक 152 बळींचा विक्रम प्रस्थापित केला. तिने ऑस्ट्रेलियाच्या मेगन स्कटचा 151 बळींचा विक्रम मागे टाकला.