India Women Cricket Team:
भारतीय महिला क्रिकेट संघानं २०२५ च्या वनडे वर्ल्डकपवर आपलं नाव कोरत इतिहास रचला. अनेकवेळा अगदी शेवटच्या क्षणी या वर्ल्डकपनं भारतीय संघाला हुलकावणी दिली होती. मात्र अखेरीस नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील क्रिकेट स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील संघानं ट्रॉफी उंचावली. यानंतर आता भारतीय महिला क्रिकेट संघावर पैशांचा आणि बक्षिसांचा वर्षाव होणार हे नव्यानं सांगायची गरज नाही.
कॅश प्राईस, बीसीसीआयचा विनिंग बोनस अन् राज्य सरकारांकडून पैश्याच्या स्वरूपातील पाठ थोपटणं सुरू होईल. मात्र आज एका व्यक्तीला विसरून चालणार नाही. ती व्यक्ती म्हणजे मंदिरा बेदी! होय होय तीच मंदिरा बेदी जी आपल्याला क्रिकेट अँकरिंग करताना दिसत होती. तिनंच महिला क्रिकेट प्रेझेंटरचा ट्रेंड भारतात पहिल्यांदा सुरू केला. ती काही मैदानावरची किंवा कॉम बॉक्स (कॉमेंट्री बॉक्स) मधील शोभेची बाहुली, गॅम डॉल नव्हती.
तिच्या क्रिकेटच्या ज्ञानाबद्दल मत मतांतरं असतील. मात्र महिला क्रिकेट अन् महिला क्रिकेटपटूंबद्दलच्या तिच्या कळवळ्याबद्दल कोणाच्याही मनात शंका असायचं कारण नाही. आज आपण या मंदिरा बेदी अन् भारतीय महिला क्रिकेट संघाच्या एका किस्सा जाणून घेणार आहोत
जवळपास दशकभरापूर्वी मंदिरा बेदी भारतीय महिला संघाचा एक सामना पाहण्यासाठी गेली होती. त्यावेळी भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी या शुभांगी कुलकर्णी होत्या. शुभांगी कुलकर्णी यांनी मंदिरा बेदी यांना तुम्ही पुरूष क्रिकेट संघासाठी एवढं काही करता मग तुम्ही महिला क्रिकेट संघासाठी का उभ्या राहत नाही असा सवाल केला होता. त्यानंतर मंदिरा बेदी यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला त्यांच्या सामन्यांसाठी स्पॉन्सरशिप मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता.
द टेलिग्राफ ला मुलाख देताना मंदिरा बेदी म्हणाल्या होत्या, 'त्यांनी त्यांच्या जाहिरातीच्या मानधनावर पाणी सोडलं होतं जेणेकरून ते पैसे महिला क्रिकेट संघासाठी वापरता येतील. मंदिरा बेदी एका ज्वेलरी ब्रँडच्या ब्रँड अम्बॅसिडोर होत्या. मला या जाहिरातीतून जे पैसे मिळाले ते क्रिकेट स्पॉन्सरशिपसाठी वळवण्यात आले.'
अस्मी (Asmi) हा ज्वेलरी ब्रँड त्यावेळी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्पॉन्सरशिपचा एक भाग होता. त्याच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 'ती एक परफेक्ट फिट होती. आम्ही अशा एका महिलेच्या शोधात होतो ती तिच्या कामामध्ये माहीर आहे. भारतीय महिला त्याबाबतीत अत्यंत चांगल्या आहेत.'
मंदिरा बेदीनं २००४ मध्ये हा ज्वेलरी ब्रँड भारतीय महिला क्रिकेट संघाला वेस्ट इंडीज विरूद्धच्या मालिकेसाठी स्पोन्सर करेल याची काळजी घेतली. ती वैयक्तिकरित्या स्पोन्सर्सकडे गेली आणि तिनं संघासाठी २००३ ते २००५ पर्यंत स्पॉन्सर मिळवून दिला.
बीसीसीआयनं नुकतेच महिला क्रिकेटपटू आणि पुरूष क्रिकेटपटूंना समान मानधनाची घोषणा केली आहे. महिला क्रिकेटच्या भरभराटीसाठी अजून बराच टप्पा गाठायचा आहे.