घुमी (द. कोरिया) : आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारताचे पदकाचे खाते उघडणार्या गुलवीर सिंगने 10,000 व 5,000 मीटर शर्यतीत अशी दोन सुवर्णपदके जिंकून इतिहास रचला; पण शुक्रवारचा दिवस चर्चेत राहिला तो 18 वर्षीय पूजा (उंच उडी) अन् 20 वर्षीय नंदिनी अगासरा (हेप्टॅथलॉन) यांच्या सुवर्ण कामगिरीने. आई-वडिलांच्या कष्टाचे चिज करताना आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारताने शुक्रवारी तीन सुवर्णपदके आणि एक रौप्यपदक जिंकले.
शुक्रवारी गुलवीर सिंगने 5,000 मीटर शर्यतीचेही ‘सुवर्ण’ नावावर केले. त्याने पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारताना हे पदक जिंकून इतिहास घडवला. त्याचवेळी महिलांच्या 3,000 मीटर स्टीपलचेस शर्यतीत पारुल चौधरीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. त्याचवेळी पारुल चौधरीने 9 मिनिटे 12.46 सेकंदात 3,000 मीटर स्टीपलचेस शर्यत पूर्ण करताना राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदक नावावर केले.
गुलवीर हा हरिचंद (1975) आणि जी लक्ष्मणन (2017) यांच्यानंतर आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांच्या 10,000 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकणारा तिसरा भारतीय ठरला. त्याने 28:38.63 वेळ नोंदवत सुवर्णपदक नावावर केले होते. 2023 मधील आशियाई स्पर्धेत त्याने 5,000 मीटर शर्यतीत कांस्यपदक जिंकले होते. शुक्रवारी त्याने या ‘कांस्य’चे रूपांतर सुवर्णपदकात केले.
गुलवीरने 13 मिनिटे 24.77 सेकंदाची वेळ नोंदवरून थायलंडच्या किएरान टुंनिवाटे (13 मिनिटे 24.97 सेकंद) आणि जपानच्या नागिया मोरी (13 मिनिटे 25 सेकंद) यांना मागे टाकून पहिला क्रमांक पटकावला. याच शर्यतीत भारताचा अभिषेक पाल 13 मिनिटे 33.51 सेकंदासह सहावा आला. एकाच आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत 5,000 मीटर आणि 10,000 मीटर धावण्याच्या शर्यतीत दुहेरी सुवर्णपदक जिंकणारा गुलवीर सिंग हा इतिहासातील दुसरा भारतीय ठरला आहे.
18 वर्षीय पूजाने उंच उडीत वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीची नोंद करताना सुवर्णपदक नावावर केले. हरियाणाच्या लहानशा गावातून आलेल्या पूजाने 1.89 मीटर उंच उडी मारली आणि तिच्या नावावर 20 वर्षांखालील असलेला राष्ट्रीय विक्रमही मोडला. या स्पर्धेत मागील 25 वर्षांत उंच उडीत (पुरुष किंवा महिला) सुवर्णपदक जिंकणारी पूजा ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली. यापूर्वी 2000 मध्ये बॉबी एलिसियस हिने 1.83 मीटर उडी मारून सुवर्णपदक जिंकले होते.
पूजाचे वडील हंसराज हे गवंडी म्हणून काम करतात. परंतु, त्यांनी पूजाच्या प्रवासात नेहमी मदत केली. पूजाने बांबूच्या खांबावर तांदळाचा भुसाच्या पोत्या घालून खेळ शिकला. हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील बोस्ती या लहानशा गावातील पूजाचा जन्म. या गावात कापूस, तांदूळ आणि बाजरीची शेती जास्त प्रमाणात केली जाते आणि या गावात पोहोचण्यासाठी दिल्लीहून रस्त्याने सुमारे चार तास प्रवास करावा लागतो.
कुटुंबात खेळाची पार्श्वभूमी नाही. हंसराज हे शांत व व्यावहारिक माणूस आहे. बोस्ती आणि आसपासच्या गावांमध्ये ते गवंडी काम करतात. त्यांची दरमहा 15,000 रुपयांची कमाई आहे. हंसराज हे चांगले कबड्डीपटू होते आणि त्यांनाही खेळाडू व्हायचे होते; पण परिस्थितीने त्यांना साथ दिली नाही.