SAFF U-19 Championship | भारताने पटकावले सातवे अंडर-19 ‘सॅफ’ विजेतेपद Pudhari File Photo
स्पोर्ट्स

SAFF U-19 Championship | भारताने पटकावले सातवे अंडर-19 ‘सॅफ’ विजेतेपद

पेनल्टी शूटआऊटमध्ये बांगला देशला हरवले

पुढारी वृत्तसेवा

कोलंबो; वृत्तसंस्था : शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक ठरलेल्या अंतिम लढतीत भारतीय युवा संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये बांगला देशचा 4-1 असा पराभव करत सातवे ‘सॅफ’ 19 वर्षांखालील चॅम्पियनशिप विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.

सामन्याच्या मध्यंतरापर्यंत भारताने दल्लामुओन गांगटे (4’) आणि अझलान शाह केएच (38’) यांच्या गोलच्या बळावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. मात्र, बांगला देशने भरपाई वेळेत इहसान हबीब रिदुआनने केलेल्या गोलमुळे सामना 2-2 असा बरोबरीत आणला आणि त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये लागला. मात्र, महत्त्वाच्या क्षणी ‘ब्लू कोल्टस्’ने आपला संयम कायम ठेवत संधीची प्रतीक्षा करण्यावर भर दिला.

शूटआऊटमध्ये भारताचा प्रगल्भ खेळ

पेनल्टी शूटआऊटमध्ये भारताच्या खेळाडूंनी प्रगल्भ खेळाची प्रचिती आणून दिली. दल्लामुओन गांगटे, कोरोऊ मेईतेई कोंथौजम आणि इंद्र राणा मगर यांनी कोणतीही चूक न करता आपले किक्स यशस्वी केले. त्यानंतर शुभम पुनियाने निर्णायक चौथा किक गोलजाळीत मारून भारताला विजय मिळवून दिला.

याउलट, बांगला देश संघ दडपणाखाली कोसळला. त्यांचा खेळाडू मोहम्मद इक्रामुल इस्लामने मारलेला फटका गोलपोस्टला लागला, तर मोहम्मद आझम खानचा प्रयत्न मानशज्योती बरुआने अप्रतिमरीत्या रोखला. बांगला देशच्या मोहम्मद माणिकने तिसरा किक यशस्वी केला असला तरी, तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT