शिमकेंट/कझाकस्तान; वृत्तसंस्था : आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिपमध्ये भारतीय नेमबाजांनी आपली विजयी घोडदौड कायम ठेवली असून, गुरुवारी झालेल्या पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात अर्जुन बाबुटा, रुद्रांक्ष पाटील आणि किरण जाधव यांच्या त्रिकुटाने सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने एकत्रितपणे 1,892.5 गुणांची कमाई करत चीनच्या संघाला मागे टाकले.
वरिष्ठ गटातील या यशाबरोबरच स्पर्धेच्या कनिष्ठ गटातही भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवला. कनिष्ठ महिलांच्या स्कीट प्रकारात मानसी रघुवंशीने अंतिम फेरीत 53 गुणांची नोंद करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. याच स्पर्धेत भारताच्याच यशस्विनी राठोडने 52 गुणांसह रौप्यपदक जिंकले.
कनिष्ठ पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारातही भारताने ‘सुवर्ण’ कामगिरी केली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या वैयक्तिक अंतिम लढतीत भारताच्या अभिनव शॉने 250.4 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. त्याने दक्षिण कोरियाच्या ली ह्यून-सेओला (250.3) केवळ 0.1 गुणाच्या निसटत्या फरकाने मागे टाकले. चीनच्या मा सिहानने 229.2 गुणांसह कांस्यपदक जिंकले.