Asian Games 2026 | भारताची एकाच दिवशी चार सुवर्णपदकांची लयलूट; सातार्‍याच्‍या साहिलचा दुहेरी ‘सुवर्ण’वेध! 
स्पोर्ट्स

Asian Games 2026 | भारताची एकाच दिवशी चार सुवर्णपदकांची लयलूट; सातार्‍याच्‍या साहिलचा दुहेरी ‘सुवर्ण’वेध!

तिरंदाजीत ३ तर नेमबाजीत १ सुवर्णपदकाची कमाई

पुढारी वृत्तसेवा

सातारा : करंडी (ता. सातारा) येथील साहिल राजेश जाधव (वय २५) याने सहा वर्षांच्या अथक संघर्षानंतर आशियाई क्रीडा स्‍पर्धेत तिरंदाजीमध्‍ये दोन गटांत ‘सुवर्ण’ जिंकून दिले आणि सातार्‍याची पताका आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर फडकावली. भारताने यावेळी तिरंदाजीत पुरुष, महिला व मिश्र तर नेमबाजीत मिश्र सांघिक अशा गटात एकूण ४ सुवर्णपदके जिंकली. शिवाय, विविध गटांतील ३ कांस्‍यपदकांचाही यात समावेश राहिला. भारताने यासह १० ‘सुवर्ण’, २१ ‘रौप्‍य’ व २९ ‘कांस्‍य’ अशा एकूण ६० पदकांसह पदकतालिकेत सातव्‍या क्रमांकावर झेप घेतली.

सातार्‍याच्‍या साहिल जाधवने तिरंदाजी कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात चिकिथा तानिपर्थीच्या जोडीने तर पुरुष सांघिक गटात कुशल दलाल, गणेश मणिरत्‍नम थिरुमुरू यांच्‍या साथीने सुवर्णपदकांचा वेध घेतला. अन्‍य इव्‍हेंटस्‌मध्‍ये भारताने महिला हॉकीत अंतिम फेरीत धडक मारली असून तेथेही आणखी एका सुवर्णपदकाची संधी असणार आहे.

भारताने यावेळी तिरंदाजीत सुवर्णपदकाची हॅट्‌ट्रिक साजरी करत नेमबाजीत मिश्र सांघिक गटातही सुवर्णपदकाचा वेध घेतला. महिला गटात ज्योती सुरेखा वेन्‍नम, चिकिथा आणि प्रीतिका प्रदीप यांनी चीनच्या वूनिएर, युए वांग आणि फान्याओ वेई यांचा २३८-२३४ असा पराभव केला. यानंतर चिकिथा आणि साहिल जाधव यांनी मिश्र सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावले. शूट-ऑफपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात या भारतीय जोडीने संयम राखत कोरियाच्या जुंग्यून पार्क आणि चोई युन ग्यू यांचा १५८-१५७ असा पराभव केला.

नेमबाजीत नीरू धांडा आणि कायनन चेनाई या जोडीने सुरुवातीच्या अडथळ्यांवर मात करत मिश्र ट्रॅप प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी घातली. भारतीय जोडीने ३४ गुणांची कमाई करत आशियाई आणि क्रीडा स्पर्धेतील नवा विक्रम नोंदवला. याशिवाय, कपिल, सुनीलकुमार व प्रिया अन्‍य विविध क्रीडा प्रकारात कांस्‍यपदकाचे मानकरी ठरले. साहिल म्‍हणाला, प्रशिक्षकांनी दिलेला कानमंत्रच ‘सुवर्ण’ जिंकून देणारा ठरला. मी ‘नागोया स्पर्धेसाठी ५२ सेकंद हा आकडा पक्का केला होता. कारण, हा आपल्या राष्ट्रगीताचा कालावधी आहे. पदकाचे लक्ष्‍य न ठेवता मी नेहमी राष्ट्रगीतासाठीच खेळतो. मी त्‍या ५२ सेकंदांपासून प्रेरणा घेतली आणि सुवर्णपदकाचा बिनचूक वेध घेतला!

साहिलसाठी आईने दागिने विकले

कोरोना काळात वडील राजेश जाधव यांची नोकरी गेली. आर्थिक अडचणी असतानाही मुलाच्या प्रशिक्षणात खंड पडू नये म्हणून आई सीमा जाधव यांनी स्वतःचे दागिने विकून साहिलला तिरंदाजीसाठी आवश्यक असलेले महागडे धनुष्य-बाण घेऊन दिले. साताऱ्यातील ‘दृष्टी आर्चरी ॲकॅडमी’मध्ये प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्याकडे त्याने तिरंदाजीचे प्राथमिक धडे घेतले. त्यानंतर कोलकाता येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात प्रशिक्षक हरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सराव सुरू आहे.

वर्षाचा खर्च ५ लाख...

साहिल हा सकाळी साडेतीन तास व संध्याकाळी साडेतीन तास तिरंदाजीचा सराव करत असतो. त्यानंतर व्यायाम असे त्याचे फिटनेस रुटिन असते. वर्षातून एकदा धनुष्य घ्यावा लागतो. त्यासाठी सुमारे अडीच लाख आणि बाणाला ५० हजार खर्च येतो. तसेच, फ्रूट, ड्रायफ्रूट आणि इतर आहारास सुमारे २ लाख असा वर्षाला ५ लाख रुपये खर्च असतो.

मी दहावी पास झाल्यानंतर तिरंदाजीला सुरुवात केली. प्रशिक्षक प्रवीण सावंत व हरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली इथपर्यंत पोहोचलो आहे. एशियन गेममधील यशानंतर आता ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि पदक जिंकणे हेच ध्येय आहे.
साहिल जाधव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT