Asian Youth Games | कबड्डीचा किंग भारत! आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुला-मुलींचे 'दुहेरी सुवर्ण' File photo
स्पोर्ट्स

Asian Youth Games | कबड्डीचा किंग भारत! आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत मुला-मुलींचे 'दुहेरी सुवर्ण'

इराणला केले पराभूत

पुढारी वृत्तसेवा

मनमा (बहारीन) : बहारीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 मध्ये भारताने कबड्डीमध्ये आपला दबदबा सिद्ध करत दुहेरी सुवर्णपदक जिंकले. मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही कबड्डी संघांनी अंतिम सामन्यात इराणचा पराभव करून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

मुलांच्या अंतिम सामन्यात भारताला इराणने जोरदार प्रतिकार केला. मात्र, एका रोमहर्षक सामन्यात भारताने 35-32 अशा फरकाने इराणचा पराभव करून सुवर्णपदक मिळवले. यापूर्वी, मुलांच्या संघाने बांगला देश, श्रीलंका, पाकिस्तान, इराण, बहारीन आणि थायलंडविरुद्ध विजय नोंदवत अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला.

मुलींच्या संघाने मात्र अंतिम सामन्यात 75-21 अशा मोठ्या फरकाने इराणचा धुव्वा उडवत एकतर्फी विजय मिळवला आणि सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले. मुलींच्या संघानेही साखळी फेरीत बांगला देश, थायलंड, श्रीलंका आणि इराणविरुद्ध विजय मिळवत अव्वल स्थान राखले होते.

कबड्डीच्या सुवर्णपदकांनी भारताच्या एकूण पदकतालिकेला मोठी चालना दिली. तायक्वाँदोमध्ये देबासीश दास (मुलांची वैयक्तिक पुमसे) आणि यशविनी सिंग व शिवांशू पटेल (मिश्र जोडी पुमसे) यांनी उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर कांस्यपदके जिंकली. या स्पर्धेत भारताच्या एकूण पदकांची संख्या 10 वर पोहोचली आहे, ज्यात 2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत 222 सदस्यीय भारतीय पथक सहभागी झाले आहे. स्पर्धेचा समारोप 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT