भारतीय महिला संघाने श्रीलंकन महिला संघाचा 82 धावांनी पराभव केला. 
स्पोर्ट्स

IND W vs SL W : भारतीय महिला संघाचा टी-20 मध्ये डंका

पुढारी वृत्तसेवा

दुबई : ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषक स्पर्धेतील महत्त्वपूर्ण साखळी सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकन महिला संघाचा 82 धावांनी फडशा पाडत मोठा विजय मिळवला आणि 0.576 अशा दमदार रनरेटसह गुणतालिकेत न्यूझीलंडला पिछाडीवर टाकत दुसरे स्थान मिळवले. भारताचा या स्पर्धेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

शफाली व स्मृतीच्या पॉवर प्लेमधील फ्लाईंग स्टार्टला हरमनप्रीत कौरच्या आक्रमक खेळीमुळे बळ मिळाले आणि या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 172 धावांचा डोंगर रचला. प्रत्युत्तरात लंकन महिला संघाचा डाव 19.5 षटकांत अवघ्या 90 धावांमध्येच खुर्दा झाला. शफाली (40 चेंडूंत 43) व स्मृती (38 चेंडूंत 50) यांनी 98 धावांची साकारलेली भागीदारी विशेष महत्त्वाची ठरली.

श्रीलंकन संघासाठी हा सलग तिसरा पराभव ठरला आणि साहजिकच त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले. भारताचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय असून, धाव सरासरी सुधारल्याने पुढील फेरीत पोहोचण्याच्या संघाच्या आशाअपेक्षा कायम राहिल्या आहेत. भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.

संक्षिप्त धावफलक

भारतीय महिला : 20 षटकांत 3 बाद 172. (हरमनप्रीत 27 चेंडूंत नाबाद 52, स्मृती मानधना 50, शफाली 43).

लंकन महिला : 19.5 षटकांत सर्वबाद 90. (कविशा 21. अरुंधती, आशा प्रत्येकी 3, रेणुका सिंग 2 बळी)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT