पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs ZIM T20 Series : शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणा-या युवा भारतीय संघाला झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या आठवड्यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली विश्वविजेता ठरलेल्या टीम इंडियाला पुढे नेण्याची जबाबदारी युवा खेळाडूंच्या खांद्यावर होती, पण अशा खराब सुरुवातीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तीन खेळाडूंनी शनिवारी झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पण तिन्ही खेळाडू सुपर फ्लॉप ठरले. या खेळाडूंच्या खराब कामगिरीचा परिणाम संघाच्या निकालावरही झाला. झिम्बाब्वेला 115 धावांवर रोखण्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली पण फलंदाजांच्या हाराकिरीमुळे जिंकलेला सामना गमावण्याची वेळ आली.
झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाने युवा खेळाडूंना संधी दिली. झिम्बाब्वेविरुद्ध मैदानात उतरलेल्या भारतीय प्लेइंग इलेव्हनवर नजर टाकली तर अभिषेक शर्मा, रियान पराग आणि ध्रुव जुरेल हे तिघे त्यांचा पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत होते. संघात अनुभवी गोलंदाज होते. पण फलंदाजीतील अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसला. अभिषेक, रियान आणि ध्रुव यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. झिम्बाब्वेची सुरुवात चांगली झाली. रवी बिश्नोई आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने 6 विकेट्स घेत झिम्बाब्वेला 115 धावांपर्यंत रोखले. बिश्नोईने 13 धावांत चार, तर वॉशिंग्टनने 11 धावांत दोन बळी घेतले.
प्रत्युत्तरात भारताची सुरुवात चांगली झाली नाही. छोट्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाचे फलंदाज झिम्बाब्वेच्या गोलंदाजांसमोर तग धरू शकले नाहीत. भारताच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही. अभिषेक, रिंकू आणि मुकेश यांना खातेही उघडता आले नाही. या सामन्यात भारताने तीन खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली. पदार्पण करणारा अभिषेक शर्मा (0) खातेही उघडू शकला नाही आणि डावाच्या पहिल्याच षटकात ब्रायन बेनेटच्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेगवर वेलिंग्टन मस्कडजाकडे झेल देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऋतुराज गायकवाडही (7) अपयशी ठरला. ब्लेसिंग मुजराबानीचा गुड लेन्थ चेंडू त्याच्या बॅटच्या काठावर आदळला आणि इनोसंट कैयाच्या हाती गेला.
चताराने पाचव्या षटकात रियान पराग (2) आणि रिंकू सिंग (0) या दोघांनाही बाद करून भारतीय संघाची अवस्था चार विकेट्सवर 22 धावा अशी केली. कर्णधार शुभमन गिल (31) एका टोकाला उभा राहिला. पण त्याला दुसऱ्या टोकाकडून सतत विकेट पडताना पहावे लागले. यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेल (6) 10व्या षटकात आणि कर्णधार गिल 11व्या षटकात बाद होताच भारतीय संघ संपूर्ण षटले तरी खेळेल का अशी शंका निर्माण झाली.
आवेश खान (16) आणि वॉशिंग्टन सुंदर (27) यांनी आठव्या विकेटसाठी 23 धावा जोडून भारताला 84 धावांपर्यंत नेले. टीम इंडियाला शेवटच्या षटकात झिम्बाब्वेविरुद्ध विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. भारताच्या 9 विकेट्सही पडल्या होत्या, पण वॉशिंग्टन सुंदर एका टोकाकडून फलंदाजी करत होता. तो काहीतरी चमत्कार करेल असे वाटत होते. पण वॉशिंग्टनने सर्वांची निराशा केली. त्याला शेवटच्या षटकात केवळ दोन धावा काढता आल्या. तो बाद झाल्यामुळे भारतीत डाव संपुष्टार आला.