स्पोर्ट्स

IND vs WI 2nd Test Score : वेस्ट इंडिजचा २४८ धावांवर खुर्दा, दुस-या डावातही लोटांगण; भारत डावाने विजय मिळवण्याच्या उंबरठ्यावर

IND vs WI 2nd Test Day 3 : वेस्ट इंडिजचा संघ फॉलोऑन वाचवू शकला नाही.

रणजित गायकवाड

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला. फॉलोऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजने २ बाद १७३ धावा केल्या आहेत. संघ अजूनही भारतापेक्षा ९७ धावांनी पिछाडीवर आहे. या कसोटीत किंवा या मालिकेत पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी ताकद दाखवली आहे. ३५ धावांत दोन विकेट गमावल्यानंतर, जॉन कॅम्पबेल आणि शाई होप यांनी आता तिसऱ्या विकेटसाठी २०७ चेंडूंत १३८ धावांची नाबाद भागीदारी केली आहे. कॅम्पबेल ८७ धावांवर आणि होप ६६ धावांवर खेळत आहेत.

कॅम्पबेलचे अर्धशतक

वेस्ट इंडिजचा सलामीवीर जॉन कॅम्पबेलने अर्धशतक झळकावले. या मालिकेत वेस्ट इंडिजकडून अर्धशतक नोंदवणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. सध्या वेस्ट इंडिजची धावसंख्या २ बाद ९० अशी आहे. कॅम्पबेलसोबत शाय होप खेळपट्टीवर उपस्थित आहे.

तिसऱ्या सत्राला प्रारंभ

चहापानानंतर तिसऱ्या सत्राचा खेळ सुरू झाला. फॉलोऑन खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघाला ३५ धावांवर दुसरा धक्का बसला होता. वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपुष्टात आला होता. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत ५ बाद ५१८ धावांवर आपला डाव घोषित केला होता. यानुसार, भारताकडे अजूनही २३५ धावांची मोठी आघाडी कायम आहे. भारतीय संघ डावाने विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.

वेस्ट इंडिजला दुसरा धक्का

वेस्ट इंडिजच्या संघाला ३५ धावांवर दुसरा मोठा धक्का बसला. फॉलोऑन खेळणाऱ्या विंडीज संघाचा डाव पहिल्या डावात २४८ धावांवर आटोपला होता. भारताने ५ बाद ५१८ धावा करून डाव घोषित केल्याने, भारताची २३५ धावांची आघाडी अजूनही कायम आहे. भारताचा संघ डावाने सामना जिंकण्यास उत्सुक आहे. तेजनारायण चंद्रपॉल (१०) आणि अलिक अथनाझे (७) धावा करून बाद झाले. अथनाझेच्या विकेटनंतरच चहापानाची घोषणा करण्यात आली.

वेस्ट इंडिजला पहिला धक्का

फॉलोऑन खेळण्यासाठी उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाला १७ धावांवर पहिला धक्का बसला. मोहम्मद सिराजने तेजनारायण चंद्रपॉलला शुभमन गिलकरवी झेलबाद केले. गिलने सूर मारून (डाईव्ह) उत्कृष्ट झेल टिपला. त्यानंतर जॉन कॅम्पबेल आणि अलिक अथनाझे यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

फॉलोऑन खेळण्यासाठी वेस्ट इंडिज संघ मैदानात

वेस्ट इंडिजचा संघ फॉलोऑन खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. तेजनारायण चंद्रपॉल आणि जॉन कॅम्पबेल यांनी डावाची सुरुवात केली. वेस्ट इंडिज अजूनही भारताच्या धावसंख्येपेक्षा २६५ धावांनी मागे आहे.

वेस्ट इंडिजचा २४८ धावांवर खुर्दा

वेस्ट इंडिजचा पहिला डाव २४८ धावांवर संपुष्टात आला. यापूर्वी, भारताने आपला पहिला डाव ५ बाद ५१८ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताला २७० धावांची मोठी आघाडी मिळाली आहे. वेस्ट इंडिजचा संघ फॉलोऑन वाचवू शकला नाही. फॉलोऑन टाळण्यासाठी त्यांना ३१९ धावांची गरज होती, परंतु संघ त्यापूर्वीच ऑल आऊट झाला. परिणामी, भारताने वेस्ट इंडिजला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजचा संघ पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला असून.

कुलदीप यादवचा भेदक मारा

वेस्ट इंडिजच्या संघाने आज सामन्याच्या तिस-या दिवशी ४ बाद १४० धावांवरून पुढे खेळायला सुरुवात केली, मात्र उर्वरित सहा फलंदाज केवळ १०८ धावांत तंबूत परतले. भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने भेदक गोलंदाजी केली. त्याने पाच बळी घेतले. ही त्याची कसोटी कारकिर्दीतील पाचवी सर्वोत्तम गोलंदाजी ठरली.

आजच्या खेळातील सुरुवातीचे तीन धक्के कुलदीपनेच दिले. त्याने शाय होप (३६), तेविन इमलाक (२१) आणि जस्टिन ग्रीव्हज (१७) यांना माघारी पाठवले. त्यानंतर, मोहम्मद सिराजने जोमेल वॉरिकनला (१) त्रिफळाचीत केले. जसप्रीत बुमराहने खेरी पिएर (२३) चा बळी घेतला. अखेरीस, कुलदीपने जेडन सील्सला (१३) पायचीत करत ८१.५ षटकांत वेस्ट इंडिजचा डाव २४८ धावांवर संपवला.

अँडरसन फिलिप २४ धावांवर नाबाद राहिला. यापूर्वी, जॉन कॅम्पबेल १०, तेजनारायण चंद्रपॉल ३४ आणि अलिक अथनाझे ४१ धावा करून बाद झाले होते. कर्णधार रोस्टन चेस याला खातेही उघडता आले नाही. भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवव्यतिरिक्त रवींद्र जडेजाने तीन बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT