नवी दिल्ली : येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात कुलदीप यादव (5/82) व रवींद्र जडेजा (3/46) यांच्या धारदार माऱ्यासमोर विंडीजचा पहिल्या डावात अवघ्या 248 धावांमध्ये खुर्दा झाला असला, तरी फॉलोऑन लादला गेल्यानंतर दुसऱ्या डावात त्यांनी तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 173 धावांपर्यंत मजल मारली. रविवारी तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी जॉन कॅम्पबेल (नाबाद 87) व शाय होप (नाबाद 67) यांनी तिसऱ्या गड्यासाठी 138 धावांची अभेद्य भागीदारी साकारली होती.
विंडीजने 4 बाद 140 या मागील धावसंख्येवरून डावाला सुरुवात करताना जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांच्याविरुद्ध सावध पवित्र्यावर भर दिला. टेविन इमलॅच आणि शाय होप ही जोडी अर्धशतकी भागीदारीच्या उंबरठ्यावर असतानाच, कुलदीपने एका अप्रतिम चेंडूवर होपच्या (36) ऑफ-स्टम्पचा वेध घेतला आणि त्यानंतर विंडीजच्या पहिल्या डावाला मोठा सुरुंग लागला. कुलदीपने आपल्या पुढच्याच षटकात इम्लाकला पायचीत पकडले. त्यानंतर लगेचच जस्टिन ग्रीव्हजलाही तंबूचा रस्ता दाखवला.
दुसऱ्या टोकाकडून मोहम्मद सिराजने रिव्हर्स स्विंगवर जोमेल वॉरिकनला तंबूचा रस्ता दाखवला आणि विंडीजची अवस्था 8 बाद 175 अशी झाली. पिएरे आणि अँडरसन फिलिप यांनी काही काळ प्रतिकार केला. मात्र, लंचनंतर बुमराहने केवळ पाचव्या चेंडूवर पिएरला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्यानंतर कुलदीप यादवने अखेरचा गडी बाद करत कसोटी क्रिकेटमधील आपले पाचवे ‘फायफर’ (एका डावात 5 बळी) पूर्ण केले आणि भारताला 270 धावांची भक्कम आघाडी मिळवून दिली.
कर्णधार शुभमन गिलने आश्चर्यकारकपणे फॉलोऑन लादण्याचा निर्णय घेतला. भारताने 80 पेक्षा जास्त षटके गोलंदाजी केली असूनही, 300 पेक्षा कमी धावांची आघाडी असताना 2015 नंतर फॉलोऑन लादणारा गिल पहिला भारतीय कर्णधार ठरला.
हा निर्णय सुरुवातीला फायदेशीर ठरला. मोहम्मद सिराजने आपल्या चौथ्या षटकात टॅगेनरेन चंद्रपॉलला शॉर्ट मिडविकेटवर उभ्या असलेल्या गिलकरवी झेलबाद केले. गिलने अप्रतिम झेप घेत हा झेल टिपला. त्यानंतर, चहापानापूर्वीच्या शेवटच्या षटकात वॉशिंग्टन सुंदरने लिक अथानाझेला एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करत विंडीजला दुसरा धक्का दिला. चहापानाच्या वेळी विंडीजची अवस्था 2 बाद 35 अशी होती. तिसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर होप जवळपास बाद झाला होता, पण ‘बंप बॉल’मुळे तो बचावला. यानंतर मात्र वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला. जॉन कॅम्पबेलने जडेजाच्या तिसऱ्याच चेंडूवर पुढे येत खणखणीत षटकार ठोकला. पुढच्याच षटकात होप यानेही सुंदरला षटकार मारत आपला इरादा स्पष्ट केला.
त्यानंतर कॅम्पबेल व शाय होप यांनी संघर्षमय खेळ साकारत अर्धशतके साजरी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कॅम्पबेल 87 धावांवर तर होप 66 धावांवर नाबाद होते. दोघांनी मिळून 138 धावांची अभेद्य भागीदारी रचली होती आणि भारताची आघाडी केवळ 97 धावांवर आणली होती. आता सामन्याच्या चौथ्या दिवशी विंडीज ही आघाडी पार करून भारतासमोर मोठे आव्हान ठेवणार की, भारतीय गोलंदाज पुनरागमन करणार, याकडे लक्ष असेल.
1 : शाय होपने वॉशिंग्टन सुंदरचा एक चेंडू डीप कव्हरकडे फटकावत कॅम्पबेलसह शतकी भागीदारी साजरी केली. ही विंडीजतर्फे या वर्षातील पहिलीच कसोटी शतकी भागीदारीदेखील ठरली.
3 : आपल्या पहिल्या डावात सर्वबाद 248 धावा जमवणाऱ्या विंडीजने आपल्या मागील 15 डावात 200 व त्याहून अधिक धावा नोंदवण्याची ही केवळ तिसरी वेळ होती.
25 : आयसीसी मॅच रेफ्रींनी विंडीज खेळाडू जयदेन सीलेसला सामना मानधनातून 25 टक्के रकमेचा दंड ठोठावला. सीलेसने यशस्वी जैस्वालच्या दिशेने धोकादायक थ्रो केला होता. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
30 : शाय होपने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 30 डावानंतर प्रथमच अर्धशतक झळकावले. त्याने 80 चेंडूंत हा टप्पा सर केला.
72 : कॅम्पबेल व शाय होप यांनी 72 धावांची भागीदारी केली, त्यावेळी विंडीजतर्फे तो या वर्षातील कोणत्याही क्रमांकासाठी नोंदवलेला उच्चांक ठरला.