मुंबई : टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणारा बलाढ्य भारतीय संघ आज (शनिवार दि. 7) अमेरिकेविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. या सलामीच्या लढतीत ‘फेव्हरेट’ असलेल्या भारतीय खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे नसेल. उलटपक्षी, अमेरिकेचा संघ अगदीच नवखा असल्याने भारतीय संघ सहज बाजी मारणार का, याकडेच लक्ष असेल. ही लढत सायंकाळी 7 पासून खेळवली जाईल.
2024 च्या विश्वविजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांसारख्या दोन दिग्गज खेळाडूंनी निवृत्ती स्वीकारली असली, तरी भारतीय संघाची ताकद यत्किंचितही कमी झालेली नाही. त्यानंतर भारताने सलग 9 मालिका जिंकत आणि आशिया चषकावर नाव कोरत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
2025 मधील खराब फॉर्म मागे सारून कर्णधार सूर्यकुमार यादवने फॉर्मात पुनरागमन केल्याने भारतीय संघ अधिक समतोल झाला आहे. यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशनचे स्फोटक पुनरागमन आणि त्याला मिळणारी युवा अभिषेक शर्माची साथ भारतासाठी जमेची बाजू ठरेल. या जोडीची आक्रमक फलंदाजी प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवण्यासाठी सज्ज आहे. मधल्या फळीत तिलक वर्माचा संयम आणि हार्दिक पंड्या, अक्षर पटेल व शिवम दुबे यांसारख्या अष्टपैलू खेळाडूंचा ताफा भारतीय फलंदाजीला अभेद्य बनवते. ‘फिनिशर’ म्हणून रिंकू सिंगवर महत्त्वाची जबाबदारी असेल.
गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हा भारताचा मुख्य आधारस्तंभ असून, त्याला अर्शदीप सिंगची चांगली साथ मिळेल. फिरकीची धुरा कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्याकडे असेल. मात्र, मध्यमगती गोलंदाज हर्षित राणा दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडला असून सिराजची संघात वर्णी लागली आहे.
विशेष म्हणजे, अमेरिकेच्या संघात सौरभ नेत्रावळकर, हरमीत सिंग आणि शुभम रांजणे हे खेळाडू आहेत, जे यापूर्वी सूर्यकुमारसोबत मुंबईच्या ड्रेसिंग रूममध्ये होते. वानखेडेच्या खेळपट्टीचा आणि परिस्थितीचा त्यांना असलेला अनुभव अमेरिकेसाठी फायदेशीर ठरू शकतो. गेल्या काही वर्षांत अमेरिकेने पाकिस्तानसारख्या संघांना पराभूत करून आपली ताकद दाखवून दिली आहे. नुकत्याच झालेल्या सराव सामन्यात त्यांनी न्यूझीलंडला कडवी झुंज दिली होती.