विशाखापट्टणम : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय (ODI) मालिकेतील तिसरा आणि अत्यंत निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे सुरू झाला असून, या सामन्यात भारतीय संघाला क्रिकेट विश्वात मोठा दिलासा मिळाला आहे. कर्णधार के.एल. राहुल याने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह गेली दोन वर्षे भारतीय क्रिकेट संघासोबत सुरू असलेला वनडेतील टॉस हरण्याचा अनलकी सिलसिला अखेर संपुष्टात आला आहे.
भारतीय संघाने सलग २० एकदिवसीय सामन्यांमध्ये टॉस गमावण्याचा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला होता. तब्बल दोन वर्षांनंतर शनिवारी (६ डिसेंबर) राहुलच्या बाजूने टॉस आला आणि हा 'नकोसा विश्वविक्रम' मोडला गेला.
यापूर्वी भारताने शेवटचा टॉस २०२३ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध जिंकला होता, तेव्हा कर्णधार रोहित शर्मा होता. तेव्हापासून रोहित शर्मा, शुभमन गिल आणि स्वतः के.एल. राहुल यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने प्रत्येक वनडेमध्ये टॉस गमावला.
रांची आणि रायपूर येथील मागील दोन वनडे सामन्यांमध्ये टॉस हरल्यामुळे निराश झालेल्या के.एल. राहुलने विशाखापट्टणममध्ये एक युक्ती वापरली. त्याने आपल्या उजव्या हाताऐवजी चक्क डाव्या हाताने नाणे हवेत फेकले.
सामनाधिकारी टॉससाठी आले तेव्हा प्रतिस्पर्धी कर्णधार बावुमाने 'हेड्स' हा कॉल दिला, पण नाणे 'टेल्स'च्या बाजूने पडले. राहुलची ही डाव्या हाताची युक्ती यशस्वी झाली आणि टॉस जिंकल्यानंतर त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्याने लगेचच छोटासा जल्लोषही केला. सहकारी खेळाडू हर्षित राणा आणि गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल यांनी त्याला लगेचच मिठी मारून शुभेच्छा दिल्या.
टॉस जिंकल्यानंतर भारताने तत्काळ वॉशिंग्टन सुंदरच्या जागी युवा फलंदाज तिलक वर्मा याला संधी दिली, तर दक्षिण आफ्रिकेच्या संघात दुखापतीमुळे बाहेर झालेल्या नांद्रे बर्गर आणि टोनी डी जॉर्जी यांच्या जागी रायन लिकल्टन आणि ओटनील बार्टमन यांचा समावेश करण्यात आला आहे.