IND v SA 1st ODI | ‘रो-को’ची प्रतिष्ठा पुन्हा पणास! 
स्पोर्ट्स

IND v SA 1st ODI | ‘रो-को’ची प्रतिष्ठा पुन्हा पणास!

मालिकेच्या माध्यमातून रोहित-विराटचे वन डेतील भवितव्य निश्चित होणार?

पुढारी वृत्तसेवा

रांची; वृत्तसंस्था : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिली वन डे रविवार, दि. 30 रोजी रांचीत खेळवली जाणार असून या मालिकेत सारा फोकस प्रामुख्याने रोहित शर्मा व विराट कोहली यांच्यावरच असणार आहे. या निमित्ताने रोहित व विराट यांचे वन डे क्रिकेटमधील भवितव्य निश्चित होईल, असे म्हटले तरी वावगे ठरू नये, इतकी ही मालिका महत्त्वाची असेल, हे सुस्पष्ट आहे. रविवारच्या पहिल्या वन डे सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.

रोहित व कोहली आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त वन डे क्रिकेटमध्येच खेळतात. आगामी 2 महिन्यांत भारतीय संघ केवळ 6 वन डे खेळणार असल्याने यातील एकेक सामना या उभयतांसाठी महत्त्वाचा असेल. यात द. आफ्रिकेविरुद्ध 3 व त्यानंतर जानेवारीत मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध 3 वन डे सामन्यांचा समावेश आहे.

अलीकडेच क सोटी मालिकेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असल्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासमोर येथे सातत्याने हुलकावणी देत असलेला मालिकाविजय खेचून आणण्याचे आव्हान असेल. गंभीर यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा करार 2027 विश्वचषकापर्यंत असला तरी कसोटीतील पराभवानंतर प्रशिक्षक म्हणून हे त्यांचे दुसरे मोठे अपयश ठरले. शिवाय, त्यांच्या धोरणात्मक निर्णयांवर आणि संघ निवडीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. गंभीरसाठी ही वन डे मालिका स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आणि मर्यादित क्रिकेटमधील भारताची जडणघडण निश्चित करण्यासाठी महत्त्वाची संधी ठरू शकते.

विराट तिसर्‍या क्रमांकावर

या मालिकेतही अनेक वरिष्ठ खेळाडू अनुपस्थित असल्याने भारताची लाईनअप नव्याने आखावी लागेल, हे स्पष्ट आहे. शुभमन गिल खेळणार नसल्याने रोहितचा सहकारी सलामीवीर जैस्वाल असेल की ऋतुराज गायकवाड, हे पाहावे लागेल. विराट तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल, हे मात्र जवळपास स्पष्ट असल्याचे संकेत आहेत. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांना विश्रांती देण्यात आली आहे, तर नियमित कर्णधार शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहेत.

मध्यफळीत फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदरला पाठिंबा द्यायचा की, आक्रमक फलंदाज नितीश कुमार रेड्डीला संधी द्यायची, यावर व्यवस्थापनाला निर्णय घ्यावा लागेल. तिलक वर्माला येथे संधी दिली जाईल का, हे देखील पाहावे लागेल. कर्णधार के. एल. राहुल यष्टिरक्षण करणार असेल, तर अंतिम एकादशमध्ये ऋषभ पंतचा समावेश असेल का, हे नाणेफेकीवेळी स्पष्ट होईल. प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांच्यावर गोलंदाजीची मुख्य भिस्त असेल.

10 वर्षांनंतर रोहित पुन्हा रांचीत

विशेष म्हणजे, 2013 मध्ये याच जेएससीए स्टेडियमवर रोहित शर्माला पूर्णवेळ सलामीवीर म्हणून पहिली संधी मिळाली होती. तो निर्णायक क्षण केवळ त्याच्या कारकिर्दीलाच नव्हे, तर पुढील अनेक वर्षांसाठी भारताच्या वन डे क्रिकेटच्या द़ृष्टिकोनाला कलाटणी देणारा ठरला होता. आता दहा वर्षांहून अधिक काळानंतर, 37 वर्षीय रोहित पुन्हा रांचीमध्ये दाखल झाला आहे.

संभाव्य संघ

भारत : के. एल. राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, ऋषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव ज्युरेल.

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्कराम, डेवाल्ड ब्रेव्हिस, नांद्रे बर्गर, क्विंटन डी कॉक, मार्को यान्सेन, टोनी डी झोर्झी, रुबिन हर्मन, ऑटिनएल बार्टमन, कॉर्बिन बॉश, मॅथ्यू ब्रित्झके, केशव महाराज, लुंगी एन्गिडी, रायन रिकेल्टन, प्रिनेलन सुब्रायन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT