दुबर्ई; वृत्तसंस्था : विजय मिळवणे, हे सर्वस्व कधीच नसते. पण, भारत-पाकिस्तान यांच्यासारखे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडतात, त्यावेळी विजयासारखे दुसरे सर्वस्व नसते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आशिया चषकाच्या तावून सुलाखून निघालेल्या व्यासपीठावर टाळलेल्या हस्तांदोलनापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह हातवारे, त्यावरून आयसीसीपर्यंत तक्रार, दंडात्मक कारवाई असे आतापर्यंत बरेच नाट्य रंगत आले असून आज रंगणार्या फायनलने त्याची जोरदार सांगता अपेक्षित आहे. उभय संघांतील ही लढत भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 8 वाजता रंगणार आहे.
यांच्यातील सीमारेषा अत्यंत धूसर करणार्या यंदाच्या आशिया चषकात आज भारतीय क्रिकेट संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर मैदानात उतरेल, त्यावेळी केवळ आणि केवळ विजय मिळवणे, हेच संघासमोरील मुख्य लक्ष्य असेल. अमेरिकन राजकीय कार्यकर्ते आणि लेखक माईक मार्क्विसी यांच्या शब्दांत सांगायचे तर, हा सामना म्हणजे ‘गोळीबाराशिवायचे युद्ध’ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे दोन्ही कट्टर संघ आमनेसामने भिडत आले, त्यावेळी संघर्षाची झालर त्याला नेहमीच होती. मात्र, यंदा क्वचितच सर्वोच्च ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर यंदाची स्पर्धा खेळवली गेली असून उभय संघांतील संघर्ष कधी नव्हे इतका टोकास पोहोचला आहे. पहलगामवरील हल्ला, ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिलेले प्रत्युत्तर, या पार्श्वभूमीवर उभय संघांत टोकाचे वैर जाणवून आले आहे. मैदानाबाहेरील तणाव, चिथावणीखोर हावभाव आणि दोन्ही संघांवर लावलेल्या दंडात्मक कारवाईत क्रिकेट अविभाज्यपणे गुंतले असताना, त्या पार्श्वभूमीवर, आजच्या सामन्यात टाकला जाणारा एकेक चेंडू विशेष महत्त्वाचा असणार आहे.
या गदारोळाच्या पलीकडे, अभिषेक शर्माचा 200 हून अधिकचा धाडसी स्ट्राईक रेट आणि पुनरागमनात कुलदीप यादवने घेतलेले 13 बळी यांसारख्या कामगिरीमुळे क्रिकेटचा रोमांच अनुभवता आला आहे. सूर्यकुमार यादवने सलामीच्या सामन्यात हस्तांदोलन टाळल्यानंतर हॅरिस रौफचे टोमणे, रौफचे आक्षेपार्ह हातवारे यामुळे वातावरण बरेच पेटले आणि नंतर रौफ, सूर्यकुमार यांना 30 टक्के दंडात त्याची परिणती झाली. ही कटुता अंतिम सामन्यापर्यंत कायम असून यामुळे एकीकडे, भारतीय संघ आज सलग दोन विजयानंतर हॅट्ट्रिक साधत जेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल तर दुसरीकडे, पाकिस्तानचा संघ मागील पराभवाचे उट्टे काढण्यासाठी नामी संधीच्या शोधात असणार आहे. भारतीय संघाला काही वेळा झगडावे लागले असले तरी संघ या स्पर्धेत अपराजित राहिला असून तीच घोडदौड आजही कायम राखण्याची संघाकडून अपेक्षा असेल. केवळ श्रीलंकेनेच भारताला सुपर ओव्हरपर्यंत झुंजवले. याउलट, पाकिस्तानचा संघ धडपडत अंतिम फेरीत पोहोचला आहे, पण बांगला देशला हरवल्यानंतर त्यांचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी म्हटल्याप्रमाणे, अंतिम सामना हाच एकमेव सामना आहे जो महत्त्वाचा ठरतो. अशा सामन्यात मागील कामगिरीला फारसे महत्त्व नसते.
रविवारचा सामना सभ्यतेपेक्षा निकालासाठी अधिक लक्षात ठेवला जाईल. शेवट गोड तर सर्व गोड या म्हणीप्रमाणे, भारतासाठी फक्त एकच शेवट स्वीकारार्ह असेल. पाकिस्तानवर विजय. तो विजय सुंदर असो वा संघर्षपूर्ण, त्याने अंतिम विश्लेषणात काही फरक पडणार नाही, हेच क्रिकेटचे जाणकार सांगत आले आहेत!
भारताचा अजिंक्य प्रवास सुरळीत असला तरी दुखापतींपासून मुक्त राहिलेला नाही. श्रीलंकेविरुद्ध हार्दिक पंड्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला एक षटक टाकल्यानंतर मैदान सोडावे लागले, तर अभिषेक शर्मालाही आखातातील उष्णतेमुळे क्रॅम्प्स आले. हार्दिकच्या दुखापतीचे मूल्यांकन सामन्याच्या दिवशी सकाळी केले जाईल. त्याला आणि अभिषेकला दोघांनाही क्रॅम्प्स आले होते, पण अभिषेक आता ठीक आहे, असे मॉर्केल यांनी शुक्रवारी रात्री सांगितले. ही बातमी दिलासा देणारी ठली.पंजाबच्या या डावखुर्या फलंदाजाने सहा सामन्यांत 309 धावा करत भारताच्या फलंदाजीची धुरा एकहाती सांभाळली आहे. यानंतर दुसर्या क्रमांकावर 144 धावांसह तिलक वर्मा आहे.
जर भारत अभिषेकवर जास्त अवलंबून असेल, तर पाकिस्तानची फलंदाजीची कमजोरी अधिक स्पष्ट आहे. त्यांची फलंदाजी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. साहिबजादा फरहान वगळता त्यांचा दुसरा कोणताही फलंदाज प्रभावी ठरलेला नाही. सईम अयुबला चार वेळा शून्यावर बाद व्हावे लागले आहे. हुसेन तलत आणि सलमान अली आगा भारताच्या फिरकी गोलंदाजांपुढे अपयशी ठरले आहेत. रविवारचा सामना पुन्हा एकदा कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीच्या जादूवर ठरू शकतो. पाकिस्तानच्या आशा नव्या चेंडूवर अवलंबून आहेत.