India vs Pakistan
दोहा: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील पारंपरिक लढत आज (दि. १६) पुन्हा रंगणार आहे. एसीसी मेन्स एशिया कप राइजिंग स्टार्स २०२५ स्पर्धेत भारत-ए आणि पाकिस्तान शाहीन्स हे संघ आमनेसामने येणार आहेत. दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. या 'ग्रुप-बी' लढतीकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
या सामन्यात भारत-ए संघाचा १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशी हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या वैभवकडून संघाला मोठ्या अपेक्षा आहेत. या स्पर्धेतील भारत-ए च्या पहिल्या सामन्यात त्याने अवघ्या ३२ चेंडूत शतक झळकावले होते. यूएई विरुद्धच्या त्या खेळीत त्याने ५२ चेंडूंत १५ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १४४ धावांची वादळी फलंदाजी केली होती.
यापूर्वी, आयपीएल २०२५ मध्येही त्याने राजस्थान रॉयल्सकडून खेळताना गुजरात टायटन्सविरुद्ध ३५ चेंडूत शतक ठोकले होते, जो आयपीएलमधील भारतीय फलंदाजाचा सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम आहे.
जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत-ए संघ या सामन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या 'नो हँडशेक पॉलिसी'चे पालन करण्याची शक्यता आहे. पहलगाम हल्ल्यातील पीडितांना पाठिंबा देण्यासाठी हे धोरण अवलंबले गेले आहे. यापूर्वी एशिया कप २०२५ मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव आणि महिला वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्याचे टाळले होते. त्याच धर्तीवर, भारत-ए चा कर्णधार जितेश शर्मा हा पाकिस्तान शाहीन्सचा कर्णधार इरफान खान याच्याशी नाणेफेक किंवा सामन्यानंतर हस्तांदोलन करणे टाळू शकतो.