बुलावायो : आयसीसी (ICC) पुरुष अंडर-19 वर्ल्ड कप 2026 मधील भारतीय संघाच्या 'सुपर सिक्स' फेरीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारताचा पहिला सामना २७ जानेवारी रोजी बुलावायो येथे यजमान झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. त्यानंतर क्रिकेट चाहत्यांना भारत आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे.
आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सलग तीन विजय नोंदवत दिमाखात सुपर सिक्स फेरीत प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 'डीएलएस' (DLS) नियमानुसार ७ गडी राखून मात करत ब-गटात अव्वल स्थान पटकावले. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तिन्ही सामने जिंकून ६ गुणांसह पुढच्या टप्प्यात मजल मारली आहे.
महामुकाबल्याची प्रतीक्षा ब-गटात अव्वल राहिल्यामुळे भारताला सुपर सिक्समधील दुसऱ्या गटात स्थान मिळाले आहे. स्पर्धेच्या स्वरूपानुसार, भारत या टप्प्यात दोन सामने खेळणार आहे. पहिला सामना २७ जानेवारी रोजी बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होईल. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात 'महामुकाबला' रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता सुरू होईल.
विशेष म्हणजे, गेल्या डिसेंबरमध्ये पार पडलेल्या अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारताचा १९१ धावांनी पराभव केला होता. त्यामुळे आगामी सामना भारतीय संघासाठी त्या पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी असेल. भारताच्या गटात इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे संघ देखील आहेत, परंतु या टप्प्यात भारताचा सामना त्यांच्याशी होणार नाही.
सुपर सिक्समध्ये एकूण १२ संघांनी स्थान मिळवले असून त्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. नियमानुसार, साखळी फेरीत ज्या संघांना पराभूत केले आहे, ते जर सुपर सिक्समध्ये पोहोचले असतील, तर त्या विजयाचे गुण पुढील फेरीत ग्राह्य धरले जातात. यामुळे भारत आणि इंग्लंड प्रत्येकी ४ गुणांसह सुपर सिक्समध्ये पोहोचले आहेत, तर पाकिस्तान, बांगलादेश, न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांना कमी गुणांसह सुरुवात करावी लागेल. म्हणूनच प्रत्येक सामना सेमीफायनलच्या शर्यतीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
साखळी फेरीत भारतीय संघाने अष्टपैलू कामगिरी केली. अमेरिकेला १०७ धावांत रोखत भारताने २० षटकांच्या आतच विजय मिळवला. बांगलादेशविरुद्ध २३८ धावांचा यशस्वी बचाव केला, तर पावसाचा व्यत्यय आलेल्या सामन्यात न्यूझीलंडला १३५ धावांवर रोखून केवळ १३.३ षटकांत लक्ष्य गाठले.
दुसरीकडे, पाकिस्तानची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून ३६ धावांनी पराभूत झाल्यानंतर त्यांनी स्कॉटलंड आणि झिम्बाब्वेला हरवून पुनरागमन केले. पाकिस्तान क-गटात दुसऱ्या स्थानावर राहून सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे.
१ फेब्रुवारी रोजी होणारा भारत-पाकिस्तान सामना सेमीफायनलची दिशा ठरवू शकतो, कारण प्रत्येक गटातून केवळ पहिले दोन संघच अंतिम चारमध्ये प्रवेश करतील.
पहिली सेमीफायनल: ३ फेब्रुवारी (बुलावायो)
दुसरी सेमीफायनल: ४ फेब्रुवारी (हरारे)
अंतिम सामना: ६ फेब्रुवारी (हरारे)
विशेष म्हणजे, या स्पर्धेनंतर फेब्रुवारी महिन्यातच वरिष्ठ भारतीय आणि पाकिस्तानी संघ टी-२० वर्ल्ड कपमध्ये आमनेसामने येतील. हा सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.