पुढारी वृत्तसेवा : आगामी आशिया चषक स्पर्धेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान हे कट्टर प्रतिस्पर्धी रविवार दि. 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमने-सामने येणार आहेत. याशिवाय, या दोन्ही संघांत सुपर-4 फेरीत स्पर्धेतील दुसरा सामना होऊ शकतो, तर फायनलमध्ये चक्क तिसर्यांदा हे दोन्ही मातब्बर संघ आमने-सामने भिडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे तीनवेळा उभय संघात जुगलबंदी रंगू शकते. एरवी भारत-पाकिस्तान यांच्या लढतीतील तिकिटे काही तासात नव्हे, तर काही मिनिटांतच सोल्ड आऊट होतात. यंदा मात्र आशिया चषकातील भारत- पाकिस्तान सामन्यांच्या तिकीट विक्रीला थंडा प्रतिसाद असल्याचे आढळून आले आहे आणि याचे कारण म्हणजे आयोजकांनी प्रेक्षकांवर लादलेली पॅकेज सिस्टीम!
मागील स्पर्धांप्रमाणे केवळ भारत-पाकिस्तान सामन्याचे तिकीट खरेदी करण्याऐवजी, यावेळी चाहत्यांना सात सामन्यांचे संपूर्ण पॅकेज खरेदी करणे आयोजकांनी अनिवार्य केले आहे. यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे. या ‘पॅकेज सिस्टीम’मागील मूळ उद्देश भारत-पाकिस्तान सामन्यासोबतच इतर सामन्यांनाही प्रोत्साहन देणे हा होता. मात्र, तिकिटांची जास्त किंमत असल्यामुळे हा प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसते. दोन्ही देशांतील आणि जगभरातील चाहत्यांनी याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे.