स्पोर्ट्स

IND vs PAK Asia Cup : भारताने पाकिस्तानला लोळवले! टीम इंडियाचा 7 विकेट्स आणि 25 चेंडू राखून विजय

Asia Cup 2025 : टीम इंडियाने 128 धावांचे लक्ष्य सहज गाठले.

रणजित गायकवाड

भारतीय संघाने आशिया चषक 2025 च्या आपल्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवला. दुबईत झालेल्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 127 धावा केल्या. प्रत्युत्तरात, सूर्यकुमार यादव (नाबाद 47), तिलक वर्मा (31) आणि अभिषेक शर्मा (31) यांच्या फलंदाजीच्या जोरावर टीम इंडियाने 128 धावांचे लक्ष्य सहज गाठले.

लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने शुभमन गिलची विकेट लवकर गमावली. गिल 10 धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर यष्टीचित झाला. त्याची विकेट सईम अयुबने घेतली. यानंतर अभिषेक शर्माने काही चांगले फटके मारले पण चौथ्या षटकात तोही बाद झाला. अयुबनेच त्याची विकेट घेतली. अभिषेकने 13 चेंडूत 31 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यात अर्धशतकी भागीदारी झाली. दोघांनी मिळून 56 धावांचे योगदान दिले. ज्यामुळे संघाचा विजय सोपा झाला. 13 व्या षटकात भारताला तिसरा धक्का बसला. तिलक वर्मा त्याच्या ३१ या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. त्यावेळी भारताची धावसंख्या 97 होती. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने एका टोकाला उभे राहून नाबाद 47 धावा फटकावल्या. सूर्याने 16 व्या षटकात एका षटकारासह भारताच्या विजयावर शिक्कामोरतब केला.

तत्पूर्वी, ठरावीक अंतराने गडी बाद होत असतानाही शाहिन शाह आफ्रिदीच्या 16 चेंडूंत 33 धावांची नाबाद खेळी आणि फरहानच्या 44 चेंडूंत 40 धावांच्या जोरावर पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 9 बाद 127 धावांपर्यंत मजल मारली. भारतातर्फे कुलदीपने 18 धावांत 3, तर अक्षर पटेल, बुमराह यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.

पाकिस्तानने या लढतीत नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला खरा; पण पहिल्या दोन षटकांतच हा निर्णय त्यांच्यावरच बुमरँगप्रमाणे उलटल्याचे अधोरेखित झाले. पहिल्या षटकात पंड्याने अयुबचा (0) तर दुसर्‍या षटकात बुमराहने हॅरिसचा (3) बळी घेत पाकिस्तानचे पॉवर प्लेमध्येच अक्षरश: कंबरडे मोडले आणि पाकिस्तानचा संघ येथेच बॅकफूटवर फेकला गेला.

यानंतर साहिबझादा फरहान व अनुभवी फखर झमान यांना सावध पवित्र्यावर भर देणे भागच होते. दुसर्‍या षटकातच बुमराहने झमानच्या तळपायाचा वेध घेणारा यॉर्कर थेट आदळल्यानंतर मैदानी पंचांनी तो बाद असल्याचा निर्णय दिला होता; पण झमानने यावर रिव्ह्यू घेतला आणि त्यात चेंडू किंचित बाहेर असल्याचे स्पष्ट झाल्याने तो बचावला होता.

डावातील चौथ्या षटकात फरहानने बुमराहला महत्त्वाकांक्षी षटकारासाठी पिटाळून लावले. मात्र, यानंतर त्याला फटकेबाजीचे फारसे स्वातंत्र्य मिळाले नाही. 6 षटकांच्या पॉवर प्लेमध्ये पाकिस्तानला 2 बाद 42 धावांपर्यंत मजल मारता आली होती. अनुभवी फखर झमानने सातत्याने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला; पण यात तो सातत्याने अपयशी ठरला आणि याच प्रयत्नात त्याने आपली विकेटही फेकली. 15 चेंडूंत 17 धावांच्या किरकोळ धावसंख्येवर त्याला परतावे लागले.

एकीकडे, ठरावीक अंतराने गडी बाद होत असताना कर्णधार सलमान आगाने देखील तोच शिरस्ता कायम राखत अवघ्या 3 धावांवर तंबूचा रस्ता धरला. आगाचा रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न सपशेल फसल्यानंतर डीप स्क्वेअर लेगवरील अभिषेकने अचूक झेल टिपला. या सलग पडझडीमुळे पहिल्या 10 षटकाअखेर पाकिस्तानची 4 बाद 49 अशी दैना उडाली होती.

13 व्या षटकात हसन नवाझही 7 चेंडूंत 5 धावांवर बाद झाला. त्याने कुलदीपच्या गोलंदाजीवर पटेलकडे सोपा झेल दिला आणि पाकिस्तानची 12.4 षटकांत 5 बाद 64 अशी दुर्दशा झाली. इतके कमी की काय म्हणून कुलदीपने याच षटकात पुढील चेंडूवर मोहम्मद नवाजचाही बळी घेतला. केवळ शेवटच्या टप्प्यात शाहिनने धडाकेबाज 33 धावा फटकावल्याने पाकिस्तानला सव्वाशे धावांचा टप्पा पार करता आला होता.

दोन षटकांत दोन धक्के...अन् पाकचा संघ शेवटपर्यंत सावरला नाही!

हार्दिक पंड्याने वाईडने सुरुवात केली; पण त्यानंतर पुढील चेंडूवरच अयुबने स्क्वेअर ड्राईव्ह मारण्याच्या प्रयत्नात पॉईंटवरील बुमराहकडे सोपा झेल दिला आणि भारताला लागलीच पहिले यश मिळाले. त्यानंतर बुमराहने आपल्या पहिल्या षटकात मोहम्मद हॅरिसला डीप बॅकवर्ड स्क्वेअरवरील पंड्याकरवी झेलबाद करत आणखी एक धक्का दिला. पंड्याने यावेळी फाईन लेगवरून धावून येत उत्तम झेल टिपला. प्रारंभीच बसलेल्या दोन धक्क्यांतून पाकिस्तानला शेवटपर्यंत सावरता आले नाही.

कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि स्वत:च जाळ्यात सापडला!

पाकिस्तानचे पहिले दोन गडी स्वस्तात बाद झाल्यानंतर अनुभवी फखर झमानवर डाव सावरण्याची मोठी जबाबदारी होती; पण येथील संथगती गोलंदाजीला अनुकूल खेळपट्टीवर मोठे फटके मारण्यात येत असलेले अपयश झुगारुन टाकण्यासाठी त्याने ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला आणि यात तो स्वत:च जाळ्यात सापडला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसल्यानंतर तिलक वर्माने लाँगऑनवरून धावून येत उत्तम झेल टिपला.

अर्धशतक फलकावर लागण्यासाठी चक्क 11 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा!

टी-20 सारख्या छोटेखानी क्रिकेट प्रकारात तोडफोड फलंदाजी हा एकच पर्याय विजयासाठी पूरक असतो. पाकिस्तानला मात्र दडपण झुगारुन टाकण्याचे कोणतेच प्रयत्न यशस्वी होत नसताना अगदी सांघिक अर्धशतक फलकावर लावण्यासाठीसुद्धा चक्क 11 व्या षटकापर्यंत प्रतीक्षा करावी लागली.

आधीच पडझड, त्यात कुलदीपचे दुहेरी झटके

पाकचा संघ एकवेळ 4 बाद 64 अशा अडचणीत असताना फिरकीपटू कुलदीपने डावातील 13 व्या षटकांत चौथ्या व पाचव्या चेंडूवर सलग दोन फलंदाज गारद करत त्यांच्या अडचणीत आणखी भर घातली. कुलदीप शेवटच्या चेंडूवर हॅट्ट्रिक पूर्ण करू शकला नाही; पण तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.

भारताला दुसरा झटका

सईम अयुबची अभिषेक शर्माला गोलंदाजी... मोठा फटका मारताना फहीम अश्रफने अभिषेकचा झेल पकडला. अयुबचा सामना करताना अभिषेक शर्माने फटकेबाजी केली. तो क्रीजमधून बाहेर आला, पण चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. हा चेंडू संथ गतीचा ऑफ ब्रेक होता. त्याने हवेत फटका मारण्याचा प्रयत्न केला पण त्याला उंची मिळाली नाही. हा लाँग-ऑफसाठी सोपा झेल होता आणि पाकिस्तानला दुसरा बळी मिळाला. अभिषेकला लाँग-ऑफवर क्षेत्ररक्षक आहे हे माहीत असूनही त्याने तो फटका मारला. अभिषेक शर्माने ३१ (१३) धावाकेल्या त्याने ४ चौकार, २ षटकार मारले.

गिल बाद

साईम अयुबची गिलला गोलंदाजी.. गिल बाद.. अप्रतिम कॅरम बॉल आणि पाकिस्तानला लवकर यश मिळाले. सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या गिलला बाद करण्यासाठी असा चेंडू महत्त्वाचा होता. गिल लांबीच्या चेंडूला पुढे जाऊन बचावासाठी खेळत असताना हा कॅरम बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर वळतो, चेंडू बाहेरच्या कडेला लागून जातो आणि मोहम्मद हारिस बाकीचे काम करतो. मागचा पाय क्रीजमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, पण गिल अडखळल्यामुळे तो पाय मागे घेऊ शकला नाही. हारिसनेही चपळाई दाखवली. मागील सामन्याप्रमाणेच, अयुबने त्याच्या पहिल्या षटकात यश मिळवले. गिलने १०(७) धावा केल्या.

आशिया चषक स्पर्धेच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला १२८ धावांचे लक्ष्य दिले. हा पाकिस्तानचा भारताच्या विरोधातील तिसरा सर्वात कमी स्कोअर ठरला आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानसाठी साहिबजादा फरहानने सर्वाधिक ४४ चेंडूंमध्ये ४० धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये शाहिन आफ्रिदीने केवळ १६ चेंडूंमध्ये ३३ धावा फटकावल्या. भारताच्या सर्व गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पाकिस्तानच्या डावावर एक नजर टाकूया.

पाकिस्तानच्या डावाचा लेखा-जोखा

फिरकीपटू कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या प्रभावी कामगिरीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानला ९ गड्यांच्या मोबदल्यात केवळ १२७ धावांत रोखले.

भारताने वेगवान माऱ्याने सुरुवातीलाच धक्के दिले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याने सईम अयुबला बाद केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहने मोहम्मद हारिसला तंबूत पाठवत पाकिस्तानची अवस्था ६ धावांवर २ बाद अशी केली.

या सुरुवातीच्या धक्क्यांमुळे भारताने सामन्यावर वर्चस्व निर्माण केले आणि त्यानंतर फिरकी गोलंदाजांनी सूत्रे हाती घेतली. कुलदीप यादवने (४-०-१८-३) आपल्या चतुराईचा उत्कृष्ट नमुना पेश केला, तर अक्षर पटेलनेही (४-०-१८-२) दुसऱ्या टोकाकडून दबाव कायम ठेवत धावगती रोखली आणि मधल्या षटकांत महत्त्वाचे बळी घेतले.

पाकिस्तानचे फलंदाज एकामागून एक बाद होत असताना, साहिबजादा फरहानने ४४ चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी केली. मात्र, पाकिस्तानच्या इतर फलंदाजांनी लोटांगण घातले. शेवटच्या षटकांत शाहीन आफ्रिदीच्या नाबाद ३३ धावांच्या (१६ चेंडू) खेळीमुळे पाकिस्तानने १०० धावांचा टप्पा ओलांडला आणि आपल्या धावसंख्येला काही प्रमाणात सन्मान मिळवून दिला.

१० षटकांनंतर संघाची धावसंख्या ४ बाद ४९ धावा

पाकिस्तानच्या आघाडीच्या फळीतील फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. सईम अयुब (०), मोहम्मद हारिस (३), फखर जमान (१७) आणि सलमान आगा (३) यांनी भारतीय गोलंदाजांपुढे लोटांगण घातले. कुलदीप यादवने सर्वाधिक ३ बळी घेतले

बुमराहच्या चेंडूवर पाकिस्तानच्या फलंदाजांकडून पहिल्यांदाच षटकार

फरहानने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर २ षटकार मारले. यापूर्वी पाकिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या ५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये बुमराहला एकही षटकार बसला नव्हता. दुसरीकडे, २०२१ पासून आतापर्यंत फखरची फिरकीपटूंविरुद्ध पुढे येऊन खेळण्याची सरासरी केवळ १३ राहिली आहे. या काळात तो आठ वेळा बाद झाला आहे. या सामन्यात त्याला अक्षर पटेलने बाद केले. पाकिस्तानने पहिल्या १० षटकांत ३७ निर्धाव चेंडू खेळले

भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले

भारताच्या सर्व गोलंदाजांनी सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. कुलदीपने ३, बुमराह आणि अक्षरने २-२ बळी घेतले. याव्यतिरिक्त, वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. कुलदीपने ४ षटकांत १८ धावा दिल्या आणि त्याची इकॉनॉमी ६ ची होती. अक्षरने ४ षटकांत १८ धावा दिल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट ४.५० होता. वरुणने ४ षटकांत फक्त २४ धावा खर्च केल्या. त्याचा इकॉनॉमी रेट ६ होता.

पाकिस्तानने भारताच्या विरोधात टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला तिसरा (१२७/९) सर्वात कमी स्कोअर नोंदवला. त्यांचा सर्वात कमी स्कोअर ८३ आहे. २०१६ मध्ये हा संघ १७.३ षटकांत ८३ धावांवर सर्वबाद झाला होता. २०२४ मध्ये पाकिस्तानचा संघ २० षटकांत ११३/७ धावाच करू शकला होता. भारतीय संघाचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वात कमी टी-२० आंतरराष्ट्रीय स्कोअर ११९ धावा आहे. हा स्कोअर २०२४ च्या विश्वचषकात नोंदवला गेला होता.

पाकिस्तानला आठवा झटका

वरुण चक्रवर्तीने अश्रफची विकेट घेतली. अश्रफ एलबीडब्ल्यू (Lbw) बाद झाला. वरुणचा हा जलद आणि फुल लेन्थ होता. फहीमला पॉइंटच्या मागे चौकार मारायचा होता, पण तो चुकला. बॉल-ट्रॅकरनुसार (ball-tracker) चेंडू मधल्या स्टंपच्या रेषेत आदळला आणि लेग स्टंपवर जाऊन धडकला.

पाकिस्तानला सातवा झटका

कुलदीप यादवने साहिबजादा फरहानला हार्दिक पंड्याच्या हाती झेलबाद केले. हा खूप उंच झेल होता, हार्दिकने तो चांगल्या प्रकारे पकडला. कुलदीपला माहीत होते की फरहान त्याला मोठे फटके मारण्यासाठी उत्सुक आहे, म्हणून त्याने हा चेंडू फलंदाजाला दूरपर्यंत खेळायला लावण्यासाठी फुल लेन्थ आणि ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. फरहान मागे हटला नाही, त्याला वाटले की तो या गुगलीवर मोठा फटका मारू शकतो, पण चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला. हार्दिक लाँग-ऑनवरून डावीकडे वेगाने धावत आला, त्याने डोक्याच्या वर तो झेल पकडला. साहिबजादा फरहानने ४०(४४) धावा केल्या.

पाकिस्तानला सहावा झटका

कुलदीप यादवने 12.5 व्या षटकात मसुदुर रहमानला एलबीडब्ल्यू बाद केले. या षटकातील त्याची सलग दुसरी विकेट होती. नवाजने review घेतला. त्यात ऑफ स्टंपवरून आत वळणाऱ्या गुगली चेंडूने लेग स्टंपचा वेध घेतल्याचे स्पष्ट झाले. नवाज शून्यावर बाद झाला.

पाकिस्तानला पाचवा झटका

कुलदीप यादवने हसन नवाजची विकेट घेतली. तो अक्षरच्या हाती झेलबाद झाला. चेंडू स्टंप्सवर उसळला, नवाजने मोठा स्लॉग-स्वीप मारण्याचा प्रयत्न केला पण तो फक्त बॅटच्या वरच्या कडेला लागला. चेंडू सरळ वर गेला आणि अक्षरने स्लिपमधील आपल्या जागेवरून चेंडू पकडला. हसन नवाजने ५(७) धावा केल्या.

पाकिस्तानला चौथा झटका

अक्षर पटेलने सलमान आगाला अभिषेक शर्माच्या हाती झेलबाद केले. अक्षरची ही दुसरी विकेट ठरली. फलंदाजाला बाद केल्यानंतर त्याने आनंद साजरा केला. चेंडू हवेतून संथ गतीने बाहेरून आला, ८५ किमी प्रति तास वेगाने टप्प्यावर पडल्यानंतर सलमानने स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला असता चेंडू उसळला. त्याचवेळी बॅटची कड घेऊन तो हवेत उडाला आणि अभिषेकने स्क्वेअर लेग सीमारेषेवर तो झेल सहज पकडला. सामन्यात भारताचे पूर्ण नियंत्रण आहे. सलमान आगाने ३(१२) धावा केल्या.

पाकिस्तानला तिसरा झटका

अक्षर पटेलने फखर जमानला तिलक वर्माच्या हाती झेलबाद केले. फखरने पाकचा डाव सवरण्याचा प्रयत्न केला पण तो अक्षरच्या फिरकी जाळ्यात अडकला. तो मोठे फटके मारण्यासाठी पुढे सरसावला. फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत उडाला आणि लाँग-ऑनवरून येणाऱ्या तिलक वर्माने कोणतीही चूक न करता झेल घेतला. फखर जमानने १७(१५) धावा केल्या. यात ३ चौकारांचा समवेश होता

पाकिस्तानने पॉवरप्लेमध्ये ४२ धावा केल्या

पॉवरप्लेमध्ये दोन विकेट गमावल्यानंतर पाकिस्तान संघाने ४२ धावा केल्या. सईम अयुब (०) आणि मोहम्मद हारिस (३) धावा काढून बाद झाले. हार्दिक आणि बुमराहने विकेट घेतल्या.

पॉवर प्ले संपले

सहाव्या षटकाच्या समाप्तीसह पॉवरप्ले संपला. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी सुरुवातीचे धक्के देऊन पाकिस्तानला बॅकफूटवर (backfoot) ढकलले. तथापि, फखर झमान आणि साहिबजादा फरहानने पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.

बुमराहच्या गोलंदाजीवर फखर जमानला एलबीडब्ल्यू (LBW) बाद देण्यात आले. फखरने त्वरित रिव्ह्यू घेतला. हा एक अप्रतिम आत येणारा यॉर्कर होता. जो त्याच्या बुटावर आदळला, पण बॉल-ट्रॅकिंगच्या माध्यमातून चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आदळल्याचे निश्चित केले. त्यामुळे तिस-या पंचांनी तो बाद नसल्याचे स्पष्ट केले.

पाकिस्तानला दुसरा धक्का

बुमराहने मोहम्मद हारिसला हार्दिक पंड्याच्या हाती झेलबाद केले. हारिसचा आक्रमक पवित्रा फार काळ टिकला नाही. त्याने खेळलेल्या पाच चेंडूंपैकी तीन फटके मारण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ऑन-साइडमध्ये जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटच्या वरच्या कडेला लागून हवेत उडाला आणि हार्दिकने तो झेल सहज पकडला. चेंडू बराच उंच उडाला होता. हार्दिकला लाँग लेगवरून खूप अंतर धावून जावे लागले. तो चतुराईने पुढे धावत आला आणि झेल पकडला.

पाकिस्तानला पहिला धक्का

हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात पाकिस्तानला पहिला धक्का दिला. हार्दिकने गोलंदाजी सुरू केली आणि पहिला चेंडू वाईड टाकला, पण पुढच्याच चेंडूवर त्याने सईम अयुबला माघारी धाडले. बुमराहने त्याच्या झेल पकडला. सईमला खातेही उघडता आले नाही आणि एक प्रकारे पहिल्याच चेंडूवर पाकिस्तानला धक्का बसला.

पाकिस्तानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आगा याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी प्लेइंग ११ मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

दोन्ही संघ

भारत : अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान : साहिबजादा फरहान, सैम अयुब, मोहम्मद हरिस (यष्टीरक्षक), फखर जमान, सलमान आगा (कर्णधार), हसन नवाज, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, सुफयान मुकीम, अबरार अहमद.

क्रिकेट चाहत्यांच्या लांबच लांब रांगा

भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केली आहे. स्टेडियमबाहेर लांबच लांब रांगांमध्ये उभे आहेत. दुबईच्या हवामानानुसार वातावरण सौम्य असल्यामुळे, समर्थकांना बाहेर थांबण्यात कोणतीही अडचण येत नाहीये. दरम्यान, सामन्यापूर्वी उत्कंठा वाढत आहे.

दोन्ही संघ विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. पाकिस्तानने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली आहे. तरी त्यांच्या फलंदाजीतील सातत्यावर प्रश्नचिन्ह कायम आहे. दुसरीकडे, भारताने सहज विजय मिळवून तयारी दर्शवली आहे. त्यांचे आघाडीचे फलंदाज चांगली कामगिरी करत आहेत आणि फिरकी गोलंदाज अचूक तालात गोलंदाजी करत आहेत. क्रिकेटमधील या सर्वात तीव्र प्रतिस्पर्धेच्या रोमांचक पर्वासाठी रंगमंच सज्ज झाला असून, चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

आशिया चषक स्पर्धेतील एकूण १८ सामन्यांपैकी, भारताने १० सामने जिंकले असून पाकिस्तानने ६ सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णित राहिले. २०१६ मध्ये टी-२० आशिया चषक सुरू झाल्यापासून, भारत-पाकिस्तानमधील सर्व तीन सामने दुबईत खेळले गेले आहेत.

भारताने २०१६ आणि २०२२ मध्ये (दोन्ही सामन्यांत पाच गडी राखून) विजय मिळवला, तर पाकिस्तानने २०२२ च्या सुपर ४ फेरीत टप्प्यात पाच गडी राखून विजय मिळवला.

२०१४ च्या आशिया चषक स्पर्धेत मीरपूर येथे त्यांचा एक सर्वात रोमांचक विजय झाला होता, जेव्हा शाहिद आफ्रिदीने शेवटच्या षटकात अनपेक्षित विजय मिळवून दिला. २४६ धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संकटात सापडला होता, पण आफ्रिदीच्या १८ चेंडूंमधील नाबाद ३४ धावांच्या खेळीने सामन्याचे चित्र पालटले. शेवटच्या षटकात विजयासाठी ९ धावांची गरज असताना, त्याने रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार मारून दोन चेंडू शिल्लक असताना एक गडी राखून विजय निश्चित केला.

भारत-पाकिस्तानच्या महासंग्रामासाठी चाहते स्टेडियममध्ये दाखल

भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज दुबई येथे होणाऱ्या सामन्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये दाखल होऊ लागले आहेत. क्रिकेट विश्वातील या दोन कट्टर स्पर्धकांमधील सामन्याची नेहमीची उत्सुकता यंदा मात्र काहीशी कमी जाणवत आहे. तरीही या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे.

मागील काही महिन्यांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर वाढलेला तणाव आणि अवघ्या चार महिन्यांवर आलेला भारतात होणारा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक अशी महत्त्वाची पार्श्वभूमी असूनही या सामन्याची हवा थंड असल्याचे दिसत आहे. पारंपरिकदृष्ट्या, भारत-पाकिस्तान सामना म्हटला की प्रचंड उत्सुकता असते, पण यंदा मात्र ही उत्सुकता शांत आहे.

भारतीय संघात शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, अभिषेक शर्मासारखे धडाकेबाज फलंदाज तसेच जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्तीसारखे प्रभावी गोलंदाज आहेत. त्यामुळे भारताचा संघ अनेक मॅच-विनर्सने भरलेला आहे. या तुलनेत, पाकिस्तानचा संघ त्यांचा नवीन कर्णधार सलमान अली आगा यांच्या नेतृत्वाखाली अजूनही संघबांधणी करत आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये अनपेक्षित निकाल लागू शकतात, पण कागदावर भारताचा संघ अधिक मजबूत दिसत आहे. दुसरीकडे, पाकिस्तानसाठी युवा सलामीवीर सईम अयुब, मधल्या फळीतील हसन नवाज आणि फिरकीपटूंचा त्रिकूट अबरार अहमद, सुफियान मुकीम आणि मोहम्मद नवाज यांच्या जोरावर आपला संघ प्रभावीपणे खेळू शकतो, हे सिद्ध करण्याची संधी आहे.

राजकीय पडसाद

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे २०० हून अधिक निष्पाप लोकांचा बळी गेला. या हल्ल्याने तणाव वाढला आहे आणि या सामन्यावर दु:खाचे सावट पसरले आहे. या हल्ल्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि वाढलेला जनक्षोभ यामुळे सामन्याच्या वातावरणातील उत्साह कमी झाला आहे.

या सामन्यासाठी हजारो तिकिटे अजूनही विक्रीविना पडून आहेत, आणि शुक्रवारी झालेल्या भारतीय संघाच्या सराव सत्रासाठी मोजकेच प्रेक्षक उपस्थित होते. सामन्यावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरत आहे, आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) किती अधिकारी या सामन्याला उपस्थित राहतील, हे अद्याप स्पष्ट नाही.

भारत सरकार बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत खेळण्याची परवानगी देत असले तरी, दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजित केल्या जात नाहीत. या संदर्भात, प्रवासादरम्यान माध्यमांनी राजकीय नाट्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण खेळाडूंनी आणि संघ प्रतिनिधींनी राजकीय प्रश्नांपासून दूर राहणे पसंत केले आहे.

फिरकी गोलंदाजांची निर्णायक लढत

हा सामना वेगवान गोलंदाजांऐवजी फिरकीपटूंवर अवलंबून असू शकतो. दोन्ही संघांकडून जसप्रीत बुमराह आणि शाहीन शाह आफ्रिदी हेच वेगवान गोलंदाज खेळण्याची शक्यता असल्याने, खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजीला फारशी मदत नसली तरी, फिरकीपटूंची भूमिका निर्णायक ठरू शकते.

दोन्ही संघांकडे उजव्या-डाव्या हाताचे एक-एक फिरकी गोलंदाज आहेत. सुफियान मुकीममध्ये प्रतिभा आहे, पण त्याच्याकडे कुलदीप यादवसारखी भेदकता नाही. कुलदीपचा गुगली खेळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. अबरार अहमदकडे वैयक्तिक शैली आहे, पण वरुण चक्रवर्तीची गूढ फिरकी पाकिस्तानच्या सईम अयुब आणि शाहीबजाद फरहानसारख्या युवा फलंदाजांना अडचणीत आणू शकते.

गोलंदाजांच्या क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असलेला मोहम्मद नवाज भारताच्या भरवशाच्या आणि दुर्लक्षित अशा अक्षर पटेलच्या कामगिरीशी बरोबरी साधू शकेल की नाही, याबाबत शंका आहे.

भारताची स्फोटक फलंदाजी

पाकिस्तानसाठी भारताची स्फोटक फलंदाजी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते. शुभमन गिल, अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांच्यासारख्या फलंदाजांमुळे भारताकडे प्रतिस्पर्धी संघाचे आक्रमण उद्ध्वस्त करू शकणारे अनेक खेळाडू आहेत.

पाकिस्तानचा फहीम अश्रफ हार्दिकच्या मॅच-विनिंग क्षमतेशी जुळणारा नाही, आणि भारतीय संघाकडे परिस्थितीशी जुळवून घेण्याची पुरेशी क्षमता आहे. पाकिस्तानसाठी एकमेव मोठा धोका शाहीन शाह आफ्रिदी आहे, ज्याने आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये केएल राहुल, रोहित शर्मा आणि नंतर विराट कोहलीला बाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. पण, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर त्याचा स्विंग आणि वेग कमी झाला आहे.

भारतासाठी योग्य फलंदाजीचा क्रम ठरवणे महत्त्वाचे ठरेल. यात संजू सॅमसनची भूमिका महत्त्वाची आहे, तर शिवम दुबेला मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंवर हल्ला करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

जरी सामन्याच्या वातावरणातील उत्साह कमी असला तरी, या सामन्याचे महत्त्व खूप मोठे आहे. भारत आणि पाकिस्तान जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा सर्व क्रिकेट जग त्यांच्याकडे डोळे लावून पाहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT