India Vs Pakistan
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मैदानाबाहेरील वैर आणि कटुतेने गाजलेल्या आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात भारताने अगदी शेवटच्या क्षणी बाजी मारल्यानंतर दोन्ही संघांतील संघर्षाला पूर्णविराम मिळेल, अशी अटकळ होती. मात्र, दोन्ही संघांतील वाद इतके विकोपास पोहोचले की, सामना संपल्यानंतरच जणू संघर्षाची नवी ठिणगी पडली. क्रिकेट जगतात पुन्हा एकदा भारत-पाकिस्तानची चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सईद अजमलचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे, ज्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या सरकारवर तीव्र टीका होत आहे.
सईद अजमलने २०२३ मध्ये एका पॉडकास्टमध्ये बोलताना २००९ च्या टी२० विश्वचषक विजयाची आठवण सांगितली होती. तत्कालीन पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी विश्वचषक विजेत्या पाकिस्तान संघातील प्रत्येक खेळाडूला २५ लाख पाकिस्तानी रुपयांचे (PKR) बक्षीस देण्याचे आश्वासन दिले होते. खेळाडू या घोषणेने आनंदित झाले, मात्र अजमलने धक्कादायक खुलासा केला की, ते चेक नंतर बाऊन्स झाले! अजमल नादिर अलीसोबतच्या पॉडकास्टमध्ये म्हणाला, “सरकारी चेक सुद्धा बाऊन्स होऊ शकतो, यावर माझा विश्वास बसला नाही. हे प्रकरण पीसीबी (PCB) प्रमुख हाताळतील असे आम्हाला सांगण्यात आले, पण त्यांनीही तो सरकारचा शब्द आहे असे सांगून मदत करण्यास नकार दिला. शेवटी, आम्हाला फक्त आयसीसीकडून (ICC) बक्षीसाची रक्कम मिळाली.”
भारताने आशिया चषक २०२५ मध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर लगेचच बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाला २१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. या पार्श्वभूमीवर, अजमलचे हे जुने वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका बाजूला भारतीय खेळाडूंवर बक्षिसांची बरसात होत असताना, दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंना खुद्द त्यांच्याच सरकारने दिलेले आश्वासन तोडल्याची बाब समोर आल्याने, दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रशासनामध्ये असलेला मोठा फरक स्पष्ट दिसत आहे.