पुढारी ऑनलाईन डेस्क : पुणे कसोटीच्या पहिल्या दिवशी पाहुण्या न्यूझीलंड संघाच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर लोटांगण घातले. वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक सात आणि आर अश्विनने तीन विकेट घेऊन किवींचा पहिला डाव 259 धावांत संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यजमान टीम इंडियाने एक गडी गमावून 16 धावा केल्या आहेत.
न्यूझीलंडकडून डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या डेव्हॉन कॉनवेने आपला उत्कृष्ट फॉर्मचे प्रदर्शन केले. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 11 वे अर्धशतक झळकावले. उपाहारापर्यंत न्यूझीलंडची धावसंख्या 2 बाद 92 होती. कर्णधार टॉम लॅथम (15) आणि विल यंग (18) हे स्वस्तात बाद झाले. यानंतर कॉनवे आणि रचिन रविंद्र यांनी डाव सावरला. कॉनवेने 11 चौकारांच्या मदतीने 76 धावा केल्या. त्याच्या रुपाने न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. यावेळी त्यांची धावसंख्या 138 होती.
मधल्या फळीत न्यूझीलंडच्या डावात सतत पडणाऱ्या विकेट्समध्ये रचिन रवींद्रने एक बाजू धरून ठेवली. त्याने अर्धशतक झळकावले. डावखुऱ्या फलंदाजाने 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 65 धावा केल्या. त्यांच्याशिवाय डॅरिल मिशेल (18), टॉम ब्लंडेल (3) आणि ग्लेन फिलिप्स (9) यांना मोठी खेळी करता आली नाही. खालच्या फळीत मिचेल सँटनरने 3 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 33 धावांची उपयुक्त खेळी खेळली.
प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी संघात समावेश झालेल्या वॉशिंग्टन सुंदरने आपली निवड योग्य ठरवली. ऑफस्पिनर सुंदरने 23.1 षटके टाकली आणि 4 मेडन षटकांसह 59 धावांत 7 बळी घेतले. त्याने रचिन (65), मिशेल (18), ब्लंडेल (3), फिलिप्स (9), टीम साऊदी (5), इजाज (4) आणि सॅन्टनर (33) यांना आपले बळी बनवले. त्याच्याशिवाय रविचंद्रन अश्विनने 3 बळी घेतले.
भारतीय संघ सध्या पहिल्या डावाच्या आधारे 243 धावांनी पिछाडीवर आहे. भारताला पहिला धक्का एका धावसंख्येवर बसला. टीम साऊदीने रोहित शर्माला क्लीन बोल्ड केले. भारतीय कर्णधाराला खातेही उघडता आले नाही. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा यशस्वी जैस्वाल (6) आणि शुभमन गिल (10) हे नाबाद तंबूत परतले. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने रोहितच्या रूपाने एकमेव यश मिळवले आहे.