IND vs ENG Semi-Final 2026: टी-20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे आणि या सामन्यात भारतासमोर दोन वेळचा विजेता इंग्लंडचा संघ समोर असणार आहे. भारताचा फॉर्म चांगला आहे, पण इंग्लंड हा मोठ्या स्पर्धांमध्ये जोरदार कामगिरी करणारा संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे.
इंग्लंडचा या स्पर्धेतील प्रवास सुरुवातीला लवकरच संपणार असं वाटत होतं. काही सामने त्यांनी कठीण परिस्थितीत जिंकले. मात्र प्रत्येक वेळी एखाद्या खेळाडूने पुढाकार घेत संघाला वाईट परिस्थितीतून बाहेर काढले. हीच त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. संघात अनेक मॅच विनर्स आहेत.
विल जॅक्स हा या स्पर्धेत इंग्लंडसाठी खऱ्या अर्थाने ‘एक्स-फॅक्टर’ ठरला आहे. त्याने मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करत संघाला वेग दिला. जवळपास 176 च्या स्ट्राइक रेटने केलेल्या धावांमुळे तो भारतासाठी मोठे आव्हान ठरु शकतो. फक्त फलंदाजीच नव्हे तर त्याने गोलंदाजीतही सात विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तो सामना कधीही फिरवू शकतो. भारतीय संघाने त्याला लवकर बाद करणं गरजेचं आहे.
आदिल राशिद हा अनुभवी लेगस्पिनर आहे. भारतीय फलंदाजांविरुद्ध त्याचा चांगला रेकॉर्ड आहे. मधल्या षटकांत तो कमी धावा देतो आणि महत्त्वाच्या विकेट्स घेतो. त्यामुळे भारतीय फलंदाजांनी संयम ठेवून खेळणे गरजेचे आहे.
सॅम करन हा टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या सामन्यांचा खेळाडू मानला जातो. तो खालच्या फळीत जलद धावा करू शकतो आणि गोलंदाजीत डेथ ओव्हर्समध्ये विकेट्स काढतो. आयपीएलमध्ये खेळल्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांची त्याला सवय आहे. भारताला सॅम करनचा सामना करणे अवघड आहे.
फिल सॉल्ट हा पॉवरप्लेमध्ये आक्रमक फलंदाजी करणारा खेळाडू आहे. तो सुरुवातीलाच गोलंदाजांवर दबाव आणतो. जर त्याने पहिल्या सहा षटकांत मोठे फटके मारले, तर भारताला लवकर रणनीती बदलावी लागू शकते. त्याला लवकर बाद करणे हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक हा शांत आणि आत्मविश्वासू खेळाडू आहे. तो कठीण परिस्थितीत मोठी खेळी करू शकतो. सुपर-8 फेरीत त्याने शतक झळकावत संघाला संकटातून बाहेर काढले होते. स्पिनविरुद्ध त्याची क्षमता चांगली आहे. मोठ्या सामन्यांतील त्याचा आत्मविश्वास इंग्लंडसाठी महत्त्वाचा आहे.
भारताकडेही दमदार गोलंदाजी आणि फलंदाजी आहे. मात्र सेमीफायनलमध्ये छोट्या चुका महागात पडू शकतात. पॉवरप्लेमधील गोलंदाजी, मधल्या षटकांत स्पिनचा वापर आणि डेथ ओव्हर्समधील नियंत्रण हे निर्णायक ठरणार आहे.
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे मोठा स्कोअर पाहायला मिळू शकतो. दबावाखाली कोणता संघ शांत राहतो आणि योग्य निर्णय घेतो, यावर निकाल अवलंबून असेल.
एकूणच, हा सामना थरारक असणार आहे. इंग्लंडचे हे पाच खेळाडू भारतासाठी मोठे आव्हान निर्माण करू शकतात. भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर योग्य रणनीती आखावी लागेल. क्रिकेटप्रेमींसाठी हा सामना खऱ्या अर्थाने ‘ब्लॉकबस्टर’ ठरणार आहे.