IND vs ENG Lord’s Test Joe Root century vs India
इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूटने भारताविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात एक शानदार शतक झळकावले आहे. त्याने 192 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. या मैदानावर रूटचे हे आठवे शतक आहे. या खेळीसह त्याने केवळ सचिन तेंडुलकरच्या एका मोठ्या विक्रमाची बरोबरी केली नाही, तर कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या अव्वल 5 फलंदाजांमध्येही स्थान मिळवले आहे. यापूर्वी, याच सामन्यात त्याने भारताविरुद्ध 3000 धावा पूर्ण करत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकले होते.
लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावून रूटने एकाच देशाविरुद्ध सर्वाधिक शतके करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 39 कसोटी सामन्यांच्या 74 डावांमध्ये 11 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने भारताविरुद्ध 24 सामन्यांच्या 46 डावांमध्ये 11 शतके नोंदवली आहेत. आता रूटनेही भारताविरुद्ध 33 सामन्यांच्या 60 डावांमध्ये हा टप्पा गाठला आहे. या यादीत सर डॉन ब्रॅडमन अव्वल स्थानी आहेत, ज्यांनी इंग्लंडविरुद्ध 37 सामन्यांच्या 63 डावांमध्ये 19 शतके झळकावली होती.
जो रूटने 156 कसोटी सामन्यांमध्ये 37 शतके पूर्ण केली आहेत. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याच्या एकूण शतकांची संख्या 55 झाली असून, त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हाशिम अमलाच्या (55 शतके) विक्रमाशी बरोबरी केली आहे.
याव्यतिरिक्त, जो रूट आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल 5 मध्ये पोहोचला आहे. याबाबतीत त्याने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथ यांना मागे टाकले आहे. द्रविड आणि स्मिथ या दोघांच्या नावावर कसोटीत प्रत्येकी 36 शतके आहेत.
जो रूटने लॉर्ड्सच्या मैदानावर आपले 8वे शतक झळकावले आहे. त्याने या मैदानावर खेळलेल्या 41 डावांमध्ये 8 शतके आणि 7 अर्धशतके नोंदवली आहेत. नाबाद 200 ही त्याची या मैदानावरची सर्वोच्च धावसंख्या आहे.