joe root century in lord's test 11th century against india
इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने मालिकेतील तिसऱ्या लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारतीय संघाविरुद्ध एक शानदार शतकी खेळी (104) साकारली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 37वे आणि भारताविरुद्धचे 11 वे शतक ठरले, जे त्याने 192 चेंडूंमध्ये पूर्ण केले. यासह, तो आता कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पाचवा सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाजही बनला आहे.
इंग्लंडने 44 धावांवर दुसरा गडी गमावला असताना रूट फलंदाजीसाठी खेळपट्टीवर आला. या अनुभवी फलंदाजाने संयमी फलंदाजी करत 102 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याने ओली पोपसोबत तिसऱ्या गड्यासाठी 109 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात त्याने आपल्या खेळीचे शतकात रूपांतर केले. तो आपल्या डावात 199 चेंडूंमध्ये 10 चौकारांच्या मदतीने 104 धावा करून बाद झाला.
या शतकासह रूटने कसोटी शतकांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला (36) मागे टाकले आहे. तो आता कसोटी क्रिकेटमध्ये जगातील पाचवा सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, रिकी पाँटिंग आणि कुमार संगकारा यांच्या नावावर आहेत.
सचिन तेंडुलकर (भारत) : 51 शतके
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) : 45 शतके
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) : ४१ शतके
कुमार संगकारा (श्रीलंका) : 38 शतके
जो रूट (इंग्लंड) : 37 शतके
7578 धावा : रिकी पाँटिंग, ऑस्ट्रेलिया
7216 धावा : सचिन तेंडुलकर, भारत
7167 धावा : महेला जयवर्धने, श्रीलंका
7035 धावा : जॅक कॅलिस, दक्षिण आफ्रिका
7000* धावा : जो रूट, इंग्लंड
रूटने मायदेशात खेळताना आपल्या 7000 कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडच्या भूमीवर हा टप्पा गाठणारा तो पहिलाच इंग्लिश फलंदाज ठरला आहे. या माजी कर्णधाराने आतापर्यंत 82 सामन्यांच्या 143 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. यामध्ये 254 धावांच्या सर्वोच्च खेळीसह 22 शतकांचाही समावेश आहे. त्याच्यानंतर इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ॲलिस्टर कुक (6,568) दुसऱ्या स्थानी आहे.
रूटने भारताविरुद्ध आतापर्यंत 33 कसोटी सामने खेळले असून, 60 डावांमध्ये 3059 धावा केल्या आहेत. तो भारताविरुद्ध 3000 कसोटी धावा पूर्ण करणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. यामध्ये 218 धावांच्या सर्वोच्च खेळीसह 11 शतकांचा समावेश आहे. भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रूटनंतर रिकी पाँटिंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगने 29 कसोटी सामन्यांमध्ये 54.36 च्या सरासरीने 2,555 धावा केल्या होत्या.
रूटने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत मिळून आपल्या 4000 धावांचा टप्पाही ओलांडला. भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तो जगातील केवळ चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्यापूर्वी रिकी पाँटिंग (4795), महेला जयवर्धने (4563) आणि कुमार संगकारा (4287) यांनी हा पराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ (3968) हा विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर आहे.
रूटने 2012 साली नागपूर येथे भारतीय संघाविरुद्ध आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत 156 कसोटी सामन्यांच्या 284 डावांमध्ये सुमारे 50 च्या उत्कृष्ट सरासरीने 13,219 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 37 शतकांव्यतिरिक्त 67 अर्धशतकेही आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 262 आहे. तो कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.