टीम इंडियाचा एक महिन्याहून अधिक कालावधीचा ब्रेक आता संपला आहे. File Photo
स्पोर्ट्स

IND vs BAN Test Series : बांगलादेशविरुद्ध रोहित शर्मा कोणाला संधी देणार?

कुलदीप यादवमुळे अक्षर पटेलचा पत्ता कट होण्याची शक्यता

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs Bangladesh Test Series : टीम इंडियाचा एक महिन्याहून अधिक कालावधीचा ब्रेक आता संपला आहे. भारत विरुद्ध बांगलादेश मालिकेतील पहिला सामना 19 सप्टेंबरला सुरू होणार आहे. दरम्यान, भारतीय संघाची तयारी आणि सराव सुरू आहे. भारतीय संघाचे गोलंदाज आणि फलंदाज घाम गाळत आहेत. मात्र, भारताची प्लेइंग इलेव्हन कशी असेल याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. भारतीय संघ सध्या सराव करत असून तेथून प्लेइंग इलेव्हनबाबत काही संकेत मिळाले आहेत. तथापि, 19 सप्टेंबर रोजी सकाळी 9 वाजता कर्णधार रोहित शर्मा नाणेफेकसाठी मैदानात उतरेल त्याच वेळी अंतिम संघाचा खुलासा होईल.

टीम इंडियाच्या खेळाडूंचा चेन्नईत सराव

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चेन्नईला पोहोचला आहे. रविवार विश्रांतीचा दिवस होता. त्यानंतर सोमवारी खेळाडूंनी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये सराव केला. सराव सत्रात विराट कोहली प्रथम फलंदाजीसाठी आला. त्याच्या शेजाच्या नेटमध्ये यशस्वी जैस्वाल तयारी करत होता. या दोन्ही फलंदाजांनी जसप्रीत बुमराह आणि रविचंद्रन अश्विनविरुद्ध फलंदाजी केली. या दोघांनंतर कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल आणि सरफराज खान फलंदाजीला आले. (IND vs BAN Test Series)

दुलीप ट्रॉफीच्या दुसऱ्या फेरीच्या सामन्यानंतर सरफराज मात्र उशिरा संघात दाखल झाला. रोहितने फिरकी गोलंदाजांविरुद्ध अधिक फलंदाजी केली. टीम इंडियाच्या फलंदाजांना यावेळी फिरकी खेळण्यात अधिक अडचणी येत आहेत. अशा स्थितीत रोहितचे संपूर्ण लक्ष त्याच्यावरच राहिले. रवींद्र जडेजा, ऋषभ पंत आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनीही थ्रोडाउन तज्ञांविरुद्ध फलंदाजीचा सराव केला.

कुलदीप यादव की अक्षर पटेलला मिळणार संधी?

चेन्नईची खेळपट्टी साधारणपणे फिरकीपटूंना अनुकूल असते. अशा स्थितीत भारतीय संघ तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर असेल, म्हणजेच आकाशदीप आणि यश दयाल यांना बाहेर बसावे लागेल. दुसरीकडे फिरकी गोलंदाजांमध्ये आर अश्विन आणि रवींद्र जडेजासह कुलदीप यादव प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्याची शक्यता आहे. असे झाले तर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने सातत्याने छाप पाडणाऱ्या अक्षर पटेलला बाहेर बसावे लागेल, असे इंडिया टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे.

दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळवली जाणार

मालिकेतील दुसरा सामना कानपूर येथे होणार आहे. कुलदीप यादव हा कानपूरचा रहिवासी आहे. म्हणजेच दुसऱ्या कसोटीतही तो खेळताना दिसेल. अशा परिस्थितीत अक्षर दुसऱ्या कसोटीतूनही बाहेर राहू शकतो. तथापि, ही अद्याप चर्चा आहे. सध्या फक्त पहिल्या कसोटीवरच लक्ष केंद्रित करावे लागेल. बांगलादेशच्या संघाने ज्या प्रकारे पाकिस्तानला त्यांच्याच घरात हरवले आहे, त्यामुळे भारतीय संघालाही यापासून सावध राहावे लागणार आहे. रोहित शर्मा अंतिम 11 बाबत काय निर्णय घेतो हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT