स्पोर्ट्स

IND vs BAN : भारताचा आज सराव सामना, बांगला देश विरोधात लढणार

मोहन कारंडे

न्यूयॉर्क : वृत्तसंस्था : टी-२० विश्वचषकाच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. स्पर्धेचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ आज शनिवारी (१ जून) बांगला देशविरूद्ध सराव सामना खेळेल. टीम इंडिया आयर्लंडविरुद्धच्या सामन्याने विश्वचषकातील आपल्या अभियानाची सुरुवात करेल. नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत आणि बांगला देश यांच्यातील सराव सामना होईल. न्यूयॉर्कमध्ये पावसाचे वातावरण असल्याने या सामन्यावर पावसाचे सावट आहे.

भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होईल. चाहत्यांना स्टार स्पोर्टस् नेटवर्कवर सामना पाहता येईल. याशिवाय डिस्नी प्लस हॉटस्टारवर या सराव सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. भारत 'अ' गटात असून, या गटात यजमान अमेरिका, पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा या संघांचा समावेश आहे.

मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी भारत एकच सराव सामना खेळणार आहे आणि लवकरात लवकर न्यूयॉर्कमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे.

कोहलीच्या खेळण्यावर साशंकता कायम

भारतीय संघ २६ मे रोजी अमेरिकेत पोहोचला आणि बुधवारपासून संघाने सराव सत्राला सुरुवात केली. विराट कोहली वगळता टीमचे सर्व सदस्य न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. कोहलीही गुरुवारी रात्री न्यूयॉर्कला रवाना झाला आणि लवकरच संघात सामील होईल, परंतु सराव सामन्यातील त्याच्या सहभागावर शंका कायम आहे. बांगला देशचा पहिला सराव सामना अमेरिकेविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. या स्पर्धेपूर्वी बांगला देशचा अमेरिकेकडून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ असा पराभव झाला होता.

दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता

सराव सामन्यात भारत आणि बांगला देशचे संघ आमनेसामने येणार असले, तरी दोन्ही संघांमधील इतिहास लक्षात घेता चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाचा बांगला देशवर वरचष्मा असून आतापर्यंत दोन्ही संघांमधील १३ पैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. टी- २० विश्वचषकाच्या मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये चुरशीचे सामने झाले आहेत.

संघ यातून निवडणार

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

बांगला देश : नजमूल हुसैन शांतो (कर्णधार), तस्कीन अहमद, लिटन दास, सौम्य सरकार, तन्जीद हसन तमीम, शाकीब अल हसन, ताव्हिद, महमुदुल्लाह रियाद, जेकर अली अनिक, तन्वीर इस्लाम, शाक मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, तन्जीद हसन साकीब.

  • स्थळ : नासाऊ स्टेडियम, न्यूयॉर्क
  • वेळ : रात्री ८ वाजता.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् लाईव्ह स्ट्रिमिंग: हॉटस्टार
SCROLL FOR NEXT