अर्शदीपने पदार्पणानंतर टी-20 पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्‍याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे. (Image source- X)
स्पोर्ट्स

अर्शदीप सिंग 'पॉवरप्ले'मधील 'किंग'!, जाणून घ्‍या विक्रमी कामगिरी

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : क्रिकेटमधील T-20 हा फॉरमॅट फलंदाजांसाठी पर्वणी तर गाेलंदाजांची सत्त्‍वपरीक्षा पाहणारा असताे. फटकेबाजी हेच या फॉरमॅटचे प्रमुख वैशिष्‍य. यामध्‍ये क्षेत्ररक्षणाला असणार्‍या मर्यादेमुळे गोलंदाजांसमाेरचे आव्‍हान आणखी खडतर हाेते. मात्र भारताचा स्‍टार गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) हा आतापर्यंतच्‍या आपल्‍या कारकीर्दीत या आव्‍हानाला माेठ्या दिमाखात समाेरे गेला आहे. पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या सहा षटकांमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो गोलंदाज आहे. ( bangladesh vs india ) रविवारी (दि.६) त्याने बांगला देशविरुद्धच्या सामन्‍यात आपल्‍या या कामगिरीची पुनरावृत्ती केली. जाणून घेवूया पॉवरप्‍लेमधील त्‍याची आजवरची विक्रम कामगिरी...

पॉवरप्‍लेमध्‍ये मोडले बांगला देशचे कंबरडे

भारत-बांगलादेश टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. ६) ग्‍वाल्‍हेरमध्‍ये झाला. भारताने हा सामना सात गडी राखून जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या विजयात अर्शदीप सिंगची गोलंदाजी महत्त्‍वपूर्ण ठरली. पॉवर प्लेमध्ये त्याने बांगलादेश संघाचे कंबरडे मोडले. पहिल्या सहा षटकांत त्‍याने बांगला देशच्‍या दोन विकेट घेतल्‍या. अर्शदीपच्‍या या दमदार कामगिरीमुळे बांगला देशचा संघ 19.5 षटकांत 127 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात भारताने 11.5 षटकांत तीन गडी गमावून लक्ष्य गाठले. सामन्‍यात अर्शदीपने 3.5 षटकात 14 धावा देत तीन बळी घेतले. तोच सामनावीर ठरला.

Arshdeep Singh : पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज

अर्शदीपने ७ जुलै २०२२ रोजी इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. अर्शदीपने आतापर्यंत T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पॉवरप्लेमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत. पदार्पणापासून आतापर्यंतच्‍या पॉवरप्लेमध्येजगातील सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अर्शदीपच्या पदार्पणापासून रवांडाच्या जप्पी बिमेनीमानाने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक 29 तर अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीने जुलै 2022 पासून टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये 28 विकेट घेतल्या आहेत.

अर्शदीपच्या T20I पदार्पणापासून पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स (७ जुलै२०२२)

  • विकेट गोलंदाज

  • ३२ अर्शदीप सिंग (भारत)

  • २९ जप्पी बिमेनीमाना (रवांडा)

  • २८ फजलहक फारुकी (अफगाणिस्तान)

  • २७ मार्क अडायर (आयर्लंड)

  • २६ पवनदीप सिंग (मलेशिया)

दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक बळी घेणारा तिसरा गोलंदाज

अर्शदीपने पॉवरप्लेमध्ये नऊ वेळा दोन किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत. न्‍यूझीलंडचा टीम साऊदी आणि अफगाणिस्‍तानच्‍या नवीन उल हक यांच्यानंतर सर्वाधिक वेळा अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू आहे. सौदीने आतापर्यंत टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण 13 वेळा पॉवरप्लेमध्ये दोन किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत, तर अफगाणिस्तानच्या नवीन उल हकने 11 वेळा अशी कामगिरी केली आहे. २५ वर्षीय अर्शदीपने आतापर्यंत भारतासाठी ५५ टी-२० सामने खेळले असून ८६ बळी घेतले आहेत. नऊ धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.

अर्शदीपने पदार्पणानंतर टी-20 पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट घेण्‍याचा आपला विक्रम कायम ठेवला आहे.

मी नेहमी शिकत राहतो : अर्शदीप सिंग

सामनावीर पुरस्‍कार मिळाल्‍यानंतर बोलताना अर्शदीप म्‍हणाला की, " मी गोलंदाजी करत होतो तिथून वारा वाहत होता. मला हवी तशी विकेट मिळाली नाही; पण चेंडू हातातून चांगला सुटत होता. मी रनअपमध्ये आणि मनगटाच्या स्थितीतही किरकोळ बदल केले आहेत. मी नेहमी शिकत राहतो. अनुभव नेहमीच कामी येतो. तुम्ही जितके जास्त खेळाल तितके नवीन शिकता येते. "

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT