स्पोर्ट्स

अश्विन-जडेजाने बांगलादेशची जिरवली! रचली नाबाद 195 धावांची विक्रमी भागिदारी

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN Test : आर अश्विनचे शतक आणि त्याने रवींद्र जडेजा (86) सोबत केलेली 195 धावांची नाबाद भागीदारी यांच्या जोरावर भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी दमदार खेळ केला. टीम इंडियाने पहिल्या दिवसअखेर सहा विकेट्सवर 339 धावांपर्यंत मजल मारली आहे.

अश्विनने (102*) आपले शतक 108 चेंडूत पूर्ण केले आणि भारताला सहा विकेट्सवर 144 धावांच्या कठीण परिस्थितीतून बाहेर काढले. त्याने चेन्नईत दुसऱ्यांदा कसोटी शतक झळकावले. त्याने 112 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारले आहेत. त्याच्यासोबत जडेजानेही अप्रतिम खेळी खेळली. 117 चेंडूंचा सामना करताना त्याने अश्विनइतकेच चौकार आणि षटकार मारले. कारकिर्दीतील पाचव्या कसोटी शतकापासून तो केवळ 17 धावा दूर आहे. बांगलादेशकडून वेगवान गोलंदाज हसन महमूदने चांगली गोलंदाजी करत चार बळी घेतले. नाहिद राणा आणि मेहदी हसन मिराज यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून वेगवान गोलंदाजांना अनुकूल परिस्थितीत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नाहिद राणा, हसन महमूद आणि तस्किन अहमद या त्यांच्या तीन वेगवान गोलंदाजांनी आपल्या कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवला.

भारताची सुरुवात चांगली झाली नाही. एक धावसंख्येवर रोहित शर्माला (6) डीआरएसद्वारे जीवदान मिळाले पण त्याचा फायदा त्याला घेता आला नाही. हसनच्या चेंडूवर दुसऱ्या स्लिपमध्ये नजमुल हसन शांतोकडे झेल देऊन तो माघारी परतला. शुभमन गिल (0) आपले खातेही उघडू शकला नाही. तो आठ चेंडू खेळून यष्टीरक्षक लिटन दासकडे झेलबाद झाला.

कोहली अपयशी, पंतचे आश्वासक पुनरागमन

विराट कोहली आठ महिन्यांनंतर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला. प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे स्वागत केले. पण तो जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही. सहा धावा केल्यानंतर त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला फटकावण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन यष्टीरक्षकाच्या हातात गेला. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद 34 झाली. भारताचे तीन मोठे फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतल्याने संघ अडचणीत सापडला. यानंतर यशस्वी जैस्वालने ऋषभ पंतच्या साथीने डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 99 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. डिसेंबर 2022 नंतर प्रथमच कसोटी खेळणारा पंत चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने सहा चौकारांसह 39 धावा केल्या. पण उपाहारानंतर तो हसनचा चौथा बळी ठरला.

जैस्वालचे अर्धशतक

जैस्वालने 95 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. सलग सहाव्या कसोटीत त्याने 50 प्लस धावा केल्या. नाहिद राणाच्या वेगवान चेंडूने त्याचा घात केला आणि स्लिपमध्ये झेलबाद झाला. काही वेळाने केएल राहुल ऑफस्पिनर मेहदी हसन मिराजच्या चेंडूवर 16 धावा काढून बाद झाला. यासह भारताची धावसंख्या सहा विकेट्सवर 144 धावा झाली. यानंतर आर अश्विन आणि रविंद्र जडेजा या जोडीने भारताला संकटातून बाहेर काढले आणि मजबूत स्थितीत आणले. या दोघांनी बांगलादेशी वेगवान गोलंदाज तसेच फिरकीपटूंचा जोरदार सामना केला. अश्विन आक्रमक राहिला आणि त्याने सुमारे 100 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याला जडेजाची योग्य अशी साथ मिळाली.

अश्विन-जडेजाने इतिहास रचला

अश्विन आठव्या क्रमांकावर आला आणि त्याने चौथ्यांदा कसोटीत शतक झळकावले. त्याच्या पुढे फक्त न्यूझीलंडचा डॅनियल व्हिटोरी आहे ज्याने पाच वेळा ही कामगिरी केली आहे. अश्विन आणि जडेजाने कसोटी क्रिकेटच्या पहिल्या दिवशी सातव्या किंवा त्याच्या खालच्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी करून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम केला. या दोघांनी न्यूझीलंडच्या जेसी रायडर आणि व्हिटोरीचा 186 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. किवी जोडीने 2009 मध्ये भारताविरुद्धच्या हॅमिल्टन कसोटीत हा विक्रम केला होता.

अक्षर-कुलदीप बाहेर

भारताने अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांचाही प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला नाही. रोहितने तीन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजसह आकाश दीप वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT