R Ashwin 
स्पोर्ट्स

‘चेपॉक’वर अश्विनची बॅट तळपली! बांगलादेशी गोलंदाजी फोडून झळकावले झुंझार अर्धशतक

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : R Ashwin Fifty : चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात एकीकडे रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिलसारखे फलंदाज 10 षटकांतच पॅव्हेलियनमध्ये परतले, तर दुसरीकडे 8व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आर अश्विनने आश्चर्यकारक कामगिरी केली. अश्विनने चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात अवघ्या 58 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याचे हे कसोटी क्रिकेटमधील 15 वे अर्धशतक ठरले आहे. यावेळी त्याचे पालक मैदानात उपस्थित होते.

भारताचा प्रमुख फिरकी गोलंदाज अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने कसोटी क्रिकेटमधील त्याचे 15 वे अर्धशतक झळकावले आहे. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी अश्विनने हा टप्पा गाठला. खेळाच्या दुसऱ्या सत्रात भारताची अवस्था 6 बाद 144 अशी झाली असताना स्टार ऑफस्पिनरने बचाव आणि प्रतिआक्रमण अशी रणनिती अवलंबून उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन केले. त्याने रवींद्र जडेजासोबत शतकी भागिदारीचा टप्पा पार लरत भारताची धावसंख्या 250 च्या पुढे नेली.

अश्विनकडून प्रतिआक्रमण करणारे अर्धशतक

मैदानात उतरल्यानंतर पहिल्याच तासात बांगलादेश गोलंदाजांनी भारताची अवस्था 3 बाद 34 अशी केली. मात्र, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्यातील आश्वासक भागीदारीने टीम इंडियाला सावरले. दोघांमध्ये 50+ धावांची भागिदारी झाली. पंत बाद झाल्याने ही जोडी फुटली. यानंतर जैस्वाल आणि केएल राहुलने भारताला 140 च्या पुढे नेले. दोघांमध्ये 48 धावांची भागिदारी झाली. ही जोडी माघारी परतल्यानंतर अश्विन आणि जडेजाने बांगलादेशच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढवला. दोघांनी अर्धशतक पूर्ण केले.

अश्विनने टीम इंडियाचा डाव सांभाळला

अश्विन जेव्हा क्रीझवर आला तेव्हा टीम इंडियाने 6 विकेट गमावल्या होत्या. जैस्वाल आणि राहुलच्या विकेट्स कमी अंतराने पडल्या. मात्र अश्विनने क्रीजवर येऊन बांगलादेशवर दडपण आणले. येताच त्याने शानदार फटकेबाजी केली. त्याचे फटके पाहून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही चकित झाले. त्याला रवींद्र जडेजाचीही चांगली साथ मिळाली. अश्विनने जडेजासोबत झटपट शतकी भागीदारी केली आणि यादरम्यान अश्विनने अवघ्या 58 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

अश्विन चांगल्या फॉर्ममध्ये

अश्विन त्याच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो पण जेव्हा कसोटी क्रिकेटचा विचार केला तर त्याचे फलंदाजीचे रेकॉर्डही अप्रतिम आहे. या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके झळकावली आहेत. नुकतेच त्याने TNPL मध्ये सलग तीन अर्धशतके झळकावून दिंडीगुल संघाला चॅम्पियन बनवले आहे. आता त्याने कठीण काळात टीम इंडियासाठी आणखी एक उत्कृष्ट खेळी साकारली आहे.

अश्विन चेपॉकचा चॅम्पियन

चेपॉक हे अश्विनचे होम ग्राउंड आहे. या मैदानावर त्याची फलंदाजी बहरते. या खेळाडूने या मैदानावर आतापर्यंत 5 कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याने 48 च्या सरासरीने आपल्या बॅटने सुमारे 300 धावा केल्या आहेत. या मैदानावर त्याने इंग्लंडविरुद्ध शतकही झळकावले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT