होबार्ट; वृत्तसंस्था : ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज जोश हेझलवूड आज (रविवार) भारताविरुद्ध होणार्या तिसर्या टी-20 सामन्यात खेळणार नसल्याने त्याच्या गैरहजेरीचा लाभ घेण्याची भारताला संधी असणार आहे. येथे विजय संपादन करत मागील पराभवाचा हिशेब चुकता करण्याची भारताला संधी असणार आहे. सध्या 5 सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियाचा संघ 1-0 अशा फरकाने आघाडीवर आहे. आजच्या तिसर्या लढतीला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजून 45 मिनिटांनी सुरुवात होईल.
आज तिसर्या टी-20 सामन्यात सर्व आघाड्यांवर सरस खेळ साकारण्यावर भारताला लक्ष केंद्रित करावे लागेल. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला सातत्याने वगळल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हेझलवूडची अचूक टप्प्यावर चेंडू टाकण्याची क्षमता आणि ‘कॉरिडॉर ऑफ अनसर्टन्टी’मध्ये तो सातत्याने निर्माण करत असलेला अनपेक्षित उसळीचा मारा भारतीय फलंदाजांसाठी त्रासदायक ठरला. मात्र, या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार्या अॅशेस कसोटी मालिकेपूर्वी विश्रांतीसाठी त्याला या टी-20 मालिकेतून मुक्त करण्यात आले आहे. आता तो मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये खेळणार नाही.
मेलबर्न येथील सामन्यानंतर स्टार सलामीवीर अभिषेक शर्मा हेझलवूडच्या गोलंदाजीवर स्तिमित झाला होता. यामुळे आम्हाला नक्कीच दिलासा मिळेल. मी यापूर्वी कधीही अशी गोलंदाजी खेळलेली नाही, असे शर्मा म्हणाला होता, ते येथे लक्षवेधी आहे. सूर्यकुमार यादव आणि शुभमन गिल या दोघांनाही अतिरिक्त उसळी आणि चांगला सीम मुव्हमेंट असलेल्या चेंडूंशी जुळवून घेण्यात अडचणी आल्या आहेत.
आजचा सामना
स्थळ : होबार्ट
वेळ : दुपारी 1.45 वा. पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क