रोहित शर्मा  File Photo
स्पोर्ट्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून रोहित शर्मा बाहेर पडणार? हिटमॅनने BCCला सांगितले...

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. पण मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. वास्तविक, पीटीआयच्या रिपोर्टनुसार, कर्णधार रोहित शर्मा वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतील पहिला किंवा दुसरा कसोटी सामना खेळू शकणार नसल्याचे समजते आहे.

22 नोव्हेंबरपासून दौरा सुरू होणार

भारतीय संघ 22 नोव्हेंबरला पर्थ येथे होणाऱ्या कसोटीने ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात करणार आहे. दरम्यान रोहित शर्मा या पहिल्या कसोटीतून किंवा 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेडमध्ये होणाऱ्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. रोहितने (Rohit Sharma) बीसीसीआय आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या याबाबत कळवले असल्याची सूत्रांची माहिती आहे.

बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, ‘या परिस्थितीबद्दल अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. रोहितने (Rohit Sharma) बीसीसीआयला एका तातडीच्या वैयक्तिक बाबीमुळे मालिकेच्या सुरुवातीला होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांपैकी एकाला मुकावे लागू शकते, अशी माहिती दिल्याचे मानले जात आहे. पण त्याने बीसीसीआयला असेही स्पष्ट केले की, मालिका सुरू होण्यापूर्वी वैयक्तिक समस्या सोडवण्यात यश आले तर तो पाचही कसोटी सामने खेळू शकतो. त्यामुळे येत्या काही दिवसांत याबाबत अधिक माहिती मिळेल,’ असे अधिका-याचे म्हणणे आहे.

रोहित खेळला नाही तर सलामीवीर कोण, कर्णधार कोण?

37 वर्षीय रोहितने बांगलादेशविरुद्ध घरचे दोन्ही कसोटी सामने खेळले. आता तो 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर कसोटी संघाचा उपकर्णधार कोण असेल याबाबत कोणतीही माहिती नाही. नुकत्याच झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या मायदेशात झालेल्या मालिकेदरम्यानही अधिकृत उपकर्णधाराची निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे जर यदाकदाचित रोहित पहिल्या किंवा दुस-या कसोटीतून बाहेर पडल्यास त्याच्या जागी कोणाला कर्णधार म्हणून निवडण्यात येईल असा प्रश्न आतापासूनच भेडसावत आहे. तसेच त्याच्या अनुपस्थितीत जैस्वालच्या साथीला सलामीला कोण येणार याची उत्सुकता लागली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT